अविवाहित कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांना निवृत्ती वेतन

  Mumbai
  अविवाहित कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर आई-वडिलांना निवृत्ती वेतन
  मुंबई  -  

  मुंबई - राज्य शासनाच्या धर्तीवर आता महापालिकेतील अविवाहित कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जाणार आहे. महापालिकेने राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार याची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे.

  महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतनाचे फायदे हे त्याचे वारसदार असलेल्या पत्नी, अज्ञान मुले यांना दिला जातो. परंतु अविवाहित कर्मचारी असल्यास त्याचा लाभ त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडील यांना दिला जात नाही. अधिनियमात तशी तरतूद नसल्यामुळे या लाभापासून अविवाहित कर्मचाऱ्यांच्या पालकांना वंचित ठेवले जाते. मात्र, याबाबत राज्य सरकारने 22 जानेवारी 2015 ला परिपत्रक जारी करून मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या आई वडिलांना कुटुंब-निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचे आदेश दिले होते. परंतु, सरकारच्या परिपत्रकानुसार महापालिकेच्या वतीने याची अंमलबजावणी केली जात नव्हती. दरम्यान, काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक राम आशिष गुप्ता यांनी 12 जुलै 2016 रोजी ठरावाच्या सूचनेद्वारे राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेतील अविवाहित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आई वडिलांना निवृत्तीचे फायदे देण्याची मागणी केली होती.

  महापालिकेच्या (निवृत्ती वेतन) नियमावली (१९५३) मधील नियम ८८(४) कुटुंब संज्ञात आतापर्यंत पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 'पत्नी', स्त्री कर्मचाऱ्याच्याबाबतीत 'पती', अज्ञान मुलगा, अविवाहित मुलगी असा समावेश आहे. आता या नियमात एकट्या मनपा कर्मचाऱ्याचे पूर्णपणे अवलंबून असलेले पालक यांचा अंतर्भाव केला आहे. तसेच या अटी व शर्तींची पूर्तता न करणाऱ्या एकट्या कर्मचाऱ्याच्या पालकांना निवृत्तीवेतन लागू होणार नसल्यामुळे महापालिका (निवृत्तीवेतन) नियमावली ५९(४) मध्ये सुधारणा करावी लागणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली आहे.

  गुप्ता यांच्या सुचनेनुसार एकट्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आई वडिलांना कुटुंब निवृत्ती वेतनाचे फायदे देण्याबाबत व राज्य शासनाने कायम करण्यापेक्षा महापालिका निवृत्तीवेतन नियमावली(१९५३) मध्ये सुधारणा करण्यासाठी स्थायी समिती व महापालिकेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.