Advertisement

जकात विभागातील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन होणार


जकात विभागातील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन होणार
SHARES

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असलेला जकात कर वसुली बंद झाल्यानंतर या विभागाचे कर्मचारी मागील दीड महिन्यापासून बसून आहेत. जकात विभागातील कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर विभागात समावून घेण्यासाठी महापालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे परीक्षा की सेवा ज्येष्ठता, या मुद्दयावरच घोडे अडल्यामुळे प्रशासनाने तूर्तास तरी समानवेतन श्रेणीवर इतर विभागांमध्ये त्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कर्मचारी, अधिकाऱ्यांना परीक्षा देणे हे बंधनकारक राहणार नसून ती ऐच्छिक राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


दीड महिना कर्मचारी बसून

मुंबई महापालिकेचा जकात कर बंद करून त्याऐवजी वस्तू व  सेवा कर लागू करण्यात आला आहे. 1 जुलैपासून जकात बंद झाल्यानंतर या विभागातील सुमारे 1300 ते 1400 कर्मचारी-कामगार हे बसून आहेत. आजही या विभागातील कर्मचाऱ्यांचे अन्य विभागांमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजही हे कर्मचारी बसून पगार घेत आहेत. जकात विभागातील कर्मचाऱ्यांना करनिर्धारण व संकलन विभागातील मालमत्ता कर विभागात पुनर्वसन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, दीड महिना उलटत आला, तरी अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही.


समान पदांवर सन्मानपूर्वक वर्णी

जकात विभागातील कर्मचाऱ्यांचे त्याच विभागात पुनर्वसन करण्यासाठी परीक्षा घेण्यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, ही परीक्षा होईपर्यंत बाजार विभाग, घनकचरा, मालमत्ता विभाग आदींमध्ये समांतर पदांवर या सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले जाणार नाही. तर समान वेतनावर इतर विभागांतील पदांवर सामावून घेतले जाईल, असे करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. या विभागांमध्ये जर या कर्मचाऱ्यांना काम करायला आवडत असेल, तर त्यांना परीक्षा देण्याची गरज नाही. परंतु त्यांना जर मालमत्ता कर विभागातच काम करायचे असेल, तर त्यांना परीक्षा द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक समान पदांवर सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


परीक्षा नको, सेवा ज्येष्ठतेवर सामावून घ्या...

जकात विभागातील कर्मचाऱ्यांना करनिर्धारण व संकलन विभागातच ठेवण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. याला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. परीक्षा घेण्याऐवजी सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन, तसेच म्युनिसिपल कामगार सेनेच्या अनुक्रमे रमाकांत बने, तसेच बाबा कदम यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षा घ्यावी की सेवा ज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, याचा विचार प्रशासन सध्या करत आहे.


कामगारांना सामावून घेणार अतिक्रमण विभागात

जकात विभागात सुमारे 300 ते 350 कामगार आहेत. या सर्वांना अतिक्रमण विभागात सामावून घेणार असल्याचे  संजोय कबरे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

जकात कर्मचारी आता 'बिनकामाचे'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा