Advertisement

वरळी, वर्सोवा व्हाया खारदांडा!


वरळी, वर्सोवा व्हाया खारदांडा!
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार असूनही केवळ जात प्रमाणपत्र नसल्यामुळे बाहेरून उमेदवार आयात करण्याची वेळ शिवसेना- भाजपासारख्या मोठ्या पक्षांवर आली आहे. खार दांडा येथील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग 99 मधून शिवसेना आणि भाजपाने अनुक्रमे वरळी आणि वर्सोवा येथील स्थानिक उमेदवारांना निवडले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत आरक्षणामुळे अनेकांची नगससेवक बनण्याची स्वप्ने साकार झाली. तर काहींची स्वप्ने भंग पावली. परंतु याच आरक्षणामुळे आणि केवळ जातीचे प्रमाणपत्र होते म्हणून कोणत्याही चर्चेत आणि स्पर्धेत नसलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली. खारदांडा येथील अनुसूचित जमातीच्या प्रभाग 99 मधून शिवसेनेच्या वतीने वरळीतील माजी नगरसेवक संजय अगरदरे आणि भाजपाच्यातीने वर्सोवा येथील जयेंद्र भानजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खारदांडा येथील या आरक्षित प्रभागातून शिवेसेनेच्या वतीने स्थानिक माजी नगरसेवक विलास चावरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी इच्छुक होते. परंतु या सर्वांकडे जात प्रमाणपत्र असले तरी ते वैध नसल्यामुळे अखेर 'एसटी'चे वैध प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराचा शोध घेऊन शिवसेनेने वरळीतील माजी नगरसेवक संजय अगरदरे यांना उमेदवारी दिली आहे. अगरदरे हे 2002 आणि 2007 या काळात नगरसेवक होते. मुंबईतील वरळी कोळीवाडा भागात सलग 9 वेळा नगरसेवक असलेल्या मणिशंकर कवठे यांच्या जागी ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर भाजपाचे उमेदवार जयेंद्र भानजी हे वर्सोवा कोळीवाडा परिसरातील आहेत.

अनुसुचित जमातीची गणना 1995 मध्ये विशेष मागासवर्गीय जातीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे 'एसटी' प्रवर्गातील महादेव कोळी समाजाचे प्रमाणपत्र आपल्याकडे असून, जे इच्छुक स्थानिक उमेदवार होते त्यांच्याकडे 'एसबीसी' चे प्रमाणपत्र आहेत. पण ते वैध ठरणार नसल्यामुळे कोळी समाजातील येथील स्थानिकांनी निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला संधी दिली असून, स्थानिक विलास चावरी, हरिशचंद्र पाटील, चिंतामणी आदींच्या सहकार्यामुळे या विभागात आपल्याला बाहेरून येऊन निवडणूक लढवत असल्याचे जाणवत नाही. मुळात भाजपाचे उमेदवार जयेंद्र भानजी हे सुद्धा वर्सोव्यातील आहेत. पण त्यांच्याही जात प्रमाणपत्राबाबत आपल्याला शंका असल्याचे अगरदरे यांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा