Advertisement

महाराष्ट्रातून ३२ लाख परप्रांतीय मजुरांनी धरला घरचा रस्ता!

कोरोनाचं वाढतं संकट आणि पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजुरांचं स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

महाराष्ट्रातून ३२ लाख परप्रांतीय मजुरांनी धरला घरचा रस्ता!
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे पुन्हा एकदा रोजगारावर आलेली संक्रांत यामुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेने निघालेले दिसून येत आहेत. मागील महिन्यामध्ये ३२ लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्र सोडल्याचं म्हटलं जात आहे.

भारतातील पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजुरांचं स्थलांतर देशानं पाहिलं आहे. वांद्रे स्थानकाबाहेर शेकडोंच्या संख्येनं जमा झालेले परप्रांतीय मजूर आणि त्यांना पांगवण्यासाठी झालेला लाठीमार ही घटना देखील सगळ्यांनाच ठाऊक असेल. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील अनेक मोठ्या शहरांतून आपापल्या गावी निघालेल्या मजुरांचे तांडे त्यावेळी रस्त्यांवर उतरले होते. रेल्वे स्टेशन, बस स्टँड इ. ठिकाणी गर्दी उसळली होती. तर मिळेल त्या साधनाने मजूर गावी परतण्याची धडपड करत होते. काहींनी तर हजारो किलोमीटरचा प्रवास, रिक्षा, दुचाकी, सायकलने केल्याची आश्चर्यकारक उदाहरणे आहेत. 

महाराष्ट्रात देखील परिस्थितीत हाताबाहेर जाऊ शकते, असं लक्षात येताच कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी देशात सर्वात पहिल्यांदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळत पुन्हा एकदा इतर उद्योगधंदे बंद ठेवण्यात आलेले आहेत. बांधकाम साइट्स बंद आहेत, कारखान्यांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेत काम सुरू आहे. यामुळे मजुरांना घरातच बसावं लागत आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने (coronavirus) गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने आपलं सगळं लक्ष तिथं केंद्रीत केलं आहे. या पार्श्वभूमीवर मजुरांचं स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होत आहे. 

हेही वाचा- मुंबईत कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी वाढला, 'असा' आहे विभागवार कालावधी

मध्य रेल्वेकडून (central railway) मिळालेल्या आकडेवारीनुसार १ एप्रिल ते ५ मे २०२१ दरम्यानच्या कालावधीत मुंबई महानगर, पुणे, सोलापूर इ. स्थानकांतून १६ लाखांहून अधिक परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार या मार्गावरून १४ लाखांहून अधिक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम इ. राज्यांत परतले आहेत.  

महाराष्ट्रातून आतापर्यंत ३२ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेल्याच्या वृत्ताला महेंद्र कल्याणकर, आयुक्त, कामगार आणि संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, यांनी देखील दुजोरा दिला आहे. शिवाय १ एप्रिलपासून ११ लाख परप्रांतीय मजूर महाराष्ट्रातून निघून उत्तर प्रदेशात आणि ४ लाख मजूर बिहारमध्ये परतल्याची माहिती देखील दिली. 

मात्र केवळ कोविड संकट आणि लाॅकडाऊन हेच या मजुरांचं महाराष्ट्रातून आपापल्या गावी परतण्याचं एकमेव कारण नसल्याचंही ते म्हणाले. शेतीचा येऊ घातलेला हंगाम, लग्नसोहळे इ. कारणांसाठीही अनेकजण गावी परतल्याचं महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केलं. यामुळे हे परप्रांतीय पुन्हा रोजगारासाठी महाराष्ट्रात येऊ शकतात.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज ५० ते ६० हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही कमालिचा ताण आलेला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा