वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या उड्डाण पुलाचा काहीसा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
अनिल सिंघ (२८), अरविंद सिंघ (२९), अझर अली (२६), मुस्तफा अली (२८), रियाझउद्दीन (२३), मोतलाब अली (२८), रियाझु अली (२१), श्रवण (४९), अतिष अली (२२), रलीस अली (२२), अझीझ उल हक (२९), परवेझ (२२), अकबर अली (२५), श्रीमांद (२५) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी करण्यात आलेल्या बचावकार्यात १४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी बहुतेक जण हे उड्डाणपुलाचं बांधकाम करणारे मजूर असल्याची माहिती मिळत आहे.