नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे टार्गेट

 Pali Hill
नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे टार्गेट

मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा सामना रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. "अनुभव नसतानाही हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला पेंग्विन पिंजर्‍याचे बांधकाम देण्यात आले. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक तन्मय शाह आणि आदित्य ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे या कंपनीला शिवसेनेचे अभय आहे," असा आरोप नितेश राणे यांनी केलाय.

यासंदर्भात नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या वेळी "हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने बोगस कागदपत्रे सादर करत पेग्विन पिंजऱ्याचे काम मिळवले आहे. बोगस कागदपत्रे सादर करून काम मिळवणाऱ्या या कंपनीवर कारवाई करावी," अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.

राणीच्या बागेतील पेंग्विन पिंजर्‍याच्या उद्घाटनालाही काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केलाय. "पालिका प्रशासनाकडून आचारसंहितेच्या काळात पेंग्विनच्या पिंजऱ्याचे उदघाटन केले जाण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळेच उद्घाटनाला विरोध दर्शविला आहे," असे नितेश यांनी स्पष्ट केले. तसंच "पेंग्विनच्या मृत्यूची आणि कंत्राट कामाची चौकशी करण्यासाठी उपयुक्त आचरेकर यांची समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच पेंग्विनचे दर्शन लोकांना खुले व्हावे," असे नितेश राणे यांनी सांगितले.

Loading Comments