मुंबईसह (mumbai) राज्यभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरीपार मजल मारली असून, याला अपवाद ठरलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, वर्धा, चंद्रपूर आणि पालघरमध्येही किमती शंभरीच्या वेशीवर आहेत.
५ राज्यांतील (maharashtra) विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असल्याच्या काळात सलग १८ दिवस देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र २ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागला आणि ४ मेपासून किमतीत सुरू झालेली तीव्र स्वरूपाची वाढ ही मधल्या काळातील विश्रांतीही भरून काढणारी ठरली आहे.
१४ वेळा झालेल्या दरवाढीतून पेट्रोल लिटरमागे ३ रुपये २८ पैशांनी, तर डिझेल ३ रुपये ८८ पैशांनी महागले आहे. परिणामी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक (९९.८७ रुपये) वगळता सर्व जिल्हे, विदर्भात चंद्रपूर (९९.८४ रुपये), वर्धा (९९.९२ रुपये) वगळता सर्व जिल्हे, तर पालघरचा अपवाद करता कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.
पालघरमध्ये पेट्रोल लिटरमागे ९९ रुपये ६१ पैशांनी म्हणजे राज्यात सर्वात स्वस्त दरात गुरुवारी उपलब्ध होते. मुंबई आणि पुण्यात पेट्रोलचे दर गुरुवारी लिटरमागे अनुक्रमे ९९.९४ रुपये आणि ९९.८९ रुपये असे होते. डिझेलचे दरही राज्यातील सर्व जिल्ह्यांत ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबई-पुण्यात डिझेल लिटरमागे अनुक्रमे ९१.८७ रुपये आणि ९०.४१ रुपये अशा किमतीत विकले जात होते.
हेही वाचा -
दारू अवैध विकली जाते म्हणून बंदी उठवणं तर्कहीन- सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवली, सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध