चंद्रपूर मधील उठवण्यात आलेली दारूबंदी दुर्दैवी आहे. एखादी गोष्ट अवैधपणे विकली जाते म्हणून त्यावरील बंदी हटवणं ही तर्कहीन गोष्ट आहे, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरील प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावरून राज्य सरकारवर (maharashtra government) विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.
यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एखाद्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवणे हा प्रकार दुर्दैवी आहे. यामागे नेमका काय तर्क आहे, याची मला माहिती नाही. समजा दारू अवैधपणे विकली जाते म्हणून दारूबंदी हटवली असेल, तर मग वर्ध्यातही मोठ्या प्रमाणात दारू अवैधपणे विकली जाते. वर्धा का सोडलं? वर्धा ही महात्मा गांधी यांची कर्मभूमी होती. वर्ध्यात महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आहे, म्हणून सोडलं?, हा तर्क इथं बसत नाही.
हेही वाचा- म्हणून चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, राज्य सरकारने दिलं 'हे' महत्त्वाचं कारण
एखादी गोष्ट अवैधरित्या विकली जाते म्हणून त्यावरील बंदी उठवायची असेल, तर गुटख्यावर बंदी का आहे? जाफरानी वर बंदी का आहे? पान परागवर बंदी का आहे? ते तर विकल्या जातात. तुम्ही कुठल्याही पानपट्टीवर गेलात, तर या गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळतात. यातून सरकारचं सरासरी १ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळे हा निर्णय तर्कहीन आहे, असं मत सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी व्यक्त केलं.
१ एप्रिल, २०१५ पासून जिल्ह्यात दारुबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारुचं प्रमाण आणि गुन्हेगारी वाढल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. तर २५७० कोटी रूपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही, अशी आकडेवारी सरकारकडून देण्यात आली आहे.
(bjp leader sudhir mungantiwar criticizes maharashtra government for lifted liquor ban in chandrapur)