दादरमध्ये फेरीवाल्यांना संरक्षण देणारा वाहन निरीक्षक निलंबित


SHARE

दादरसह सर्व मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पूर्ण बंदी आहे. मात्र तरीही, दादरमध्ये या परिसरात फेरीवाले बसलेले आढळून आल्याने तेथील वाहन निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

दादर येथील डिसिल्व्हा रोडवर दुपारी साडे तीनच्या सुमारास फेरीवाले बसल्याचे दिसून आल्यावर मनसेने ही बाब जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे या बाबतचे पुरावे मनसेने सादर केल्यानंतर वाहन निरीक्षक विजेंद्र धनावडे यांना १५ नोव्हेंबर २०१७ या एका दिवसाकरता सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.नक्की घडलं काय?

दादर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे बंदी असून हा परिसर फेरीवाला मुक्त जाहीर करण्यात आला आहे. या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसू नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या आणि पथक तैनात करण्यात आले आहे. तरीही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता फेरीवाले याठिकाणी बसले होते. ही बाब नागरिकांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या सर्व फेरीवाल्यांचे चित्रण केले. त्यानंतर त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसह जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

त्यांनतर बिरादार यांनी १५० मीटर परीसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी असताना तिथे पुन्हा फेरीवाले बसल्याचे आढळून आल्याने याला जबाबदार असलेल्या बेजबाबदार तसेच निष्काळजी वाहन निरिक्षकाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. वाहन निरिक्षक विजेंद्र धनावडे याला एक दिवसाकरता निलंबित करण्याचे आदेश रमाकांत बिरादर यांनी काढले. रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.


मनसेचं काय म्हणणं आहे?

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, "मनसेच्या मागणीनुसार ही कारवाई सुरु आहे. प्रत्येक वेळी मनसेनेच फेरीवाल्यांवर लक्ष ठेवायचे का?" असा सवाल केला आहे. "यापूर्वी या अधिकाऱ्यांना दम देऊनही त्यांच्याकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांवर कारवाई करायला लावू, असा इशारा मनसेच्या वतीने आम्ही दिला होता. त्यानुसार अखेर दादरमध्ये फेरीवाले आढळून आल्यानंतर या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी आम्ही केली", असे देशपांडे यांनी सांगितले.हेही वाचा

दादरचे फेरीवाले का हटत नाहीत?


संबंधित विषय