Advertisement

दादरचे फेरीवाले का हटत नाहीत?


दादरचे फेरीवाले का हटत नाहीत?
SHARES

'फेरीवाले हटवा, हे फेरीवाले हटवले नाहीत, तर १५ ऑक्टोबरनंतर मनसे स्टाईलमध्ये आम्हीच फेरीवाले हटवू, असा धमकीवजा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता.

त्यानुसार ५ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी फेरीवाले हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबईमधील काही विभागात फेरीवाल्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना हटवणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. फेरीवाल्यांची संख्या अधिक असलेले मुख्य ठिकाण म्हणजे दादर रेल्वे स्थानक परिसर आणि कबुतर खाना.



५ तारखेपासून सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात महापालिका कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात यश आले आहे. पण अजूनही संपूर्ण फेरीवाले हटवण्यात जी/उत्तर विभागाचे कर्मचारी अपयशी ठरल्याचे सध्या दादरमध्ये पाहायला मिळत आहे.

जी/उत्तर विभागात या संदर्भात विचारले असता कर्मचारी पूर्ण प्रयत्न करत आहेत तसेच दादर स्टेशन हा मुख्य फोकस आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवणे तसेच गळ्यांमध्ये बसणारे फेरीवाले हटवले जात आहेत. ज्या फेरीवाल्यांचे स्टॉल आहेत त्यांना हटवणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु, जे फेरीवाले छोट्या टोपल्या किंवा वस्तू घेऊन फिरणारे आहेत ते कारवाईनंतर काही वेळात पुन्हा त्या ठिकाणी बसतात, अशी माहिती जी/उत्तर विभागाच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.


फेरीवाल्याची संख्या अधिक

दादरमध्ये फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. कारवाई झाल्यानंतर काही वेळात या ठिकाणी दुकानाचे ठेले लावतात. महिला फेरीवाल्यांची संख्या अधिक असल्यामुळे कारवाईला अडथळा निर्माण होत आहे. कमी पैशात वस्तू खरेदी करणे सोपे असल्यामुळे नागरिक देखील वस्तू खरेदी करतात. त्यामुळे फेरीवाल्यांना प्रोत्साहन मिळते. लोकांनी बाहेर खरेदी करणे बंद केले, तर फेरीवाल्यांची संख्या कमी होईल.


मागील ४० वर्षांपासून मी येथे धंदा करत आहे. पादचाऱ्यांना फेरीवाल्यांमुळे त्रास होतो, हे मला मान्य अाहे. परंतु मी धंदा केला नाही तर मुलांचे पालन पोषण कसे करू? राज ठाकरे त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. महापालिका त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, पण आम्ही रोजी रोटी कमवण्यासाठी काय करायचे? हे सरकारने आधी सांगावे. स्वस्त दरात सामान मिळते म्हणून हीच जनता वस्तू खरेदी करण्यासाठी आमच्याकडे येते ना? महापालिकेचा दंड असो किंवा हप्ता प्रत्येकवेळी आम्हालाच टार्गेट केले जाते.

- वसंत साळुंखे, फेरीवाले, विक्रेते


मागील २२ वर्षांपासून मी येथे व्यवसाय करतो. माझा धंदा स्टेशनपासून लांब आहे. माझ्यामागे ७ व्यक्ती खाणारे आहेत. या वयात मला कुणीही नोकरी देणार नाही. राज ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे. पण स्टेशन परिसरातले फेरीवाले हटवा. सरसकट सर्व फेरीवाले हटवले तर आम्ही काय खायचं? आमच्या कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी सरकार घेणार का? आम्ही या ठिकाणी धंदे लावणार नाही.

- आनंद पवार, फेरीवाले , विक्रेते


श्रेय कुणाचं आणि सत्य काय?

मनसेच्या मोर्चानंतर मुंबईमधील अतिक्रमण हलवायला जोमाने सुरुवात झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जनतेला मोकळा श्वास हवा आहे आणि राजकारण्यांना श्रेय हवं आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात महापालिका काही अंशी यशस्वी झाली असल्याचे दिसून येत आहे. पण राज ठाकरे यांच्या मोर्चामुळे फेरीवाले हटल्याची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी सेनेमुळे फेरीवाले हटले, असा दावा केला. पण सत्य परिस्थितीत मात्र महापालिका जी/उत्तर विभागाचे फेरीवाले हटवताना तारेवरची कसरत होत आहे. 

दादर परिसरात कमी वस्तू घेऊन विक्रीसाठी बसणारे फेरीवाले महापालिका कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारवाईनंतर काही वेळातच हे फेरीवाले पुन्हा ठेले लावतात. त्यामुळे कितीही कारवाई केली तर फेरीवाले हटण्याचे नाव घेत नाहीत, असं चित्र सध्या दादरमध्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे कितीही राजकीय गप्पा रंगल्या तरीही दादरमधील फेरीवाले १५ दिवसांत हटणार का? हा देखील तितकाच औत्सुक्याचा विषय आहे.



हेही वाचा - 

दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईत रेल्वे पोलीस चुस्त, महापालिका सुस्त

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा