Advertisement

राजकीय दबावामुळे वन रुपी क्लिनिक बंद होणार

वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक रूग्णांना उपचार देण्यात आले असून १५०० रूग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाले आहेत. मात्र, तरीही हे क्लिनिक बंद करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समोर येत आहे.

राजकीय दबावामुळे वन रुपी क्लिनिक बंद होणार
SHARES

मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर अत्यल्प दरामध्ये प्राथमिक उपचार पुरवणारे वन रूपी क्लिनिक बंद होणार आहे. वन रुपी क्लिनिकचे (इएमआर) संचालक राहुल घुले यांनी तसे पत्र मध्य रेल्वेकडे दिले आहेत. गंभीर बाब म्हणजे, वन रुपी क्लिनिक बंद करण्यासाठी आपल्यावर अनावश्यक राजकीय दबाव येत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.



राजकीय दबावामुळे क्लिनिक बंद

आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी वन रुपी क्लिनिक(इएमआर) ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक रूग्णांना उपचार देण्यात आले असून १५०० रूग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाले आहेत. मात्र, तरीही हे क्लिनिक बंद करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समोर येत आहे.


डिपॉझिट भरूनही इएमआर हस्तांतरण नाही

मध्य रेल्वेवरच्या २० स्थानकांवर वन रुपी क्लिनिक सेवा प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातल्या १२ स्थानकांवर हे इएमआर सुरूही करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही ८ इएमआर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, २० इएमआरसाठीचं डिपॉझिट मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात भरण्यात आल्याचा दावा वन रुपी क्लिनिकचे राहुल घुले यांनी केला आहे.



टप्प्याटप्प्याने बंद होणार क्लिनिक्स

राहुल घुले यांनी मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्रानुसार टप्प्याटप्प्याने मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील इएमआर बंद करण्यात येणार आहेत. हे वन रुपी क्लिनिक दुसऱ्या जागांवर सुरू करण्यात येतील असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

सर्वात आधी मुलुंड, वाशी आणि विक्रोळी स्थानकांवरचे वन रुपी क्लिनिक बंद करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाकीचे बंद होतील. प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या दबावामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्थानकांवरील वन रुपी क्लिनिक बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी ते पुन्हा नव्या जोमाने सुरू करू.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक



मध्य रेल्वेकडून कोणतीही मदत नाही

पश्चिम रेल्वेवरही वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी दर महिना २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेकडून कसलीही मदत आतापर्यंत झालेली नाही. तरीही हे क्लिनिक बंद करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचंही डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.



हेही वाचा

वन रुपी क्लिनिकच्या कामगिरीने केंद्र सरकार खूश, म्हणूनच घेतला 'हा' निर्णय!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा