Advertisement

फेरीवाल्यांचा 'वाल्या'

गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांविरोधी कारवायाच थंड पडल्याचं चित्र होतं. दाखवण्यासाठी काही वेळा महापालिकेची गाडी फिरायची आणि ठरल्याप्रमाणे गाड्या, ठेले उचलून नेण्याचे नाटक रंगायचे. गाडी गेल्यागेल्याच फेरीवाल्यांचा धंदा बिनबोभाट सुरू राहायचा. आता पुन्हा हा मुद्दा मरणासन्न झालेल्या मनसेनं उचलला आणि दुसरीकडं अवकळा आलेल्या काँग्रेसमधल्या निरुपमसारख्यांनीही या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केला.

फेरीवाल्यांचा 'वाल्या'
SHARES

सध्या मुंबईत फेरीवाल्यांवरून राजकारण रंगलंय. तसा फेरीवाला हा प्रश्न आजचा नाहीच. अगदी जुन्या जाणत्या मंडळींकडून कहाण्या ऐकतो, त्यानुसार महापालिका आयुक्त पिंपुटकरांपासून उपायुक्त गो. रा. खैरनार, चंद्रशेखर रोकडे यांसारख्या अधिकाऱ्यांनी केलेल्या फेरीवालाविरोधी कारवाया चर्चेत असायच्या.

गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांविरोधी कारवायाच थंड पडल्याचं चित्र होतं. दाखवण्यासाठी काही वेळा महापालिकेची गाडी फिरायची आणि ठरल्याप्रमाणे गाड्या, ठेले उचलून नेण्याचे नाटक रंगायचे. गाडी गेल्यागेल्याच फेरीवाल्यांचा धंदा बिनबोभाट सुरू राहायचा. क्रिकेटमधलं मॅचफिक्सिंग आणि या कारवायांचं फिक्सिंग जणू सारखंच असल्यागत! आता पुन्हा हा मुद्दा मरणासन्न झालेल्या मनसेनं उचलला आणि दुसरीकडं अवकळा आलेल्या काँग्रेसमधल्या निरुपमसारख्यांनीही या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न केला.

मुळात, फेरीवाला म्हणजे फेरीचा धंदा करणारा छोटा व्यावसायिक. चारचाकी गाडीवर किंवा इतर प्रकारे गल्लोगल्ली फिरून भाजी, छोट्या-मोठ्या वस्तू विकणारा व्यावसायिक. महापालिकेकडून अशांना परवाने दिले जातात. परंतु, कालानुरुप या धंद्याने विकृत स्वरुप धारण करायला सुरुवात केली. रस्त्यांच्या कडेला, फुटपाथवर, रेल्वे ब्रीजवर अगदी मोकळी दिसेल त्या जागेवर कायमस्वरुपी धंदा लावून एकप्रकारे जागाच हडपण्याचे उद्योग सुरू झाले.

याला अधिकारी, नेते, पोलिस, स्थानिक गुंडांपासून अगदी आपण सर्वच जबाबदार आहोत. बाकीचे हप्ते घेतात तर आपण या फेरीवाल्यांकडून वस्तू घेतो, इतकाच काय तो फरक! आता या गरीब बिच्चाऱ्या मराठी-अमराठी फेरीवाल्यांच्या पोटावर पाय आणून राजकारण खेळण्याचे उद्योग होऊ नयेत, म्हणून अनेकांना पुळका येतोय. पण, जेव्हा हा फेरीवालारुपी वाल्मिकी वाल्या बनत होता, तेव्हा त्याला सहकार्य करणाऱ्यांवर खरी कारवाई व्हायला नको का?

म्हणजे, अगदी स्पष्ट सांगायचं तर मुंबईची अवस्था बिघडवण्यास कारण ठरणाऱ्या त्या प्रत्येकावर कारवाई व्हायला हवी जो कायदे फाट्यावर मारून केवळ जात, प्रांत, भाषा इथपासून कोणत्याही प्रकारच्या दबावाने स्वतःची पोळी भाजून घेतो.

पण, हे करणार कोण? गेली अनेक वर्ष मुंबई शहरावर सत्ता गाजवणारी शिवसेना? की सत्तेत बसलेली भाजपा-शिवसेना? की अस्तित्वाची लढाई लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना?

उत्तर आहे – कुणीच नाही!

इतका निराशावादी सूर का म्हणाल तर कारण आहोत आपण स्वतः!

आजवर कितीजणांनी फेरीवालामुक्त परिसर वगैरेची घोषणा केली? जाहिरनाम्यात आश्वासनं दिली? याचा आढावा घेतला तर आपण अशांना पुन्हा पुन्हा निवडून दिलंय. त्यामुळे आता आपल्याला या विषयावर बोलण्याचा तरी अधिकार राहिलाय का?

असो, खरंच स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई पहायची असेल, तर सुरुवात आपणच करायला हवी. अर्थात, गेल्या अनेक वर्षांपासून केवळ घोषणेपुरती आणि बॅनरबाजीपुरती असलेली ही घोषणा आता तरी आपण मनापासून प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करूयात. त्यासाठी सर्वप्रथम अनधिकृत फेरीवाल्यांकडून खरेदी थांबवूयात. अगदी स्वस्त आणि मस्त माल असला तरी...बोला आहे शक्य?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा