Advertisement

पवई क्रेन दुघर्टना: मिशिगन कंपनीच्या कंत्राटांना बसणार चाप

पवईतील मलवाहिन्याच्या कामात क्रेन कोसळून ४ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर या विकासकामाचा कंत्राटदार मिशिगन कंपनीच्या सर्वच कंत्राटांना आता चाप लागणार आहे. पवईतील मलवाहिन्याच्या कामाला स्थगितीचे आदेश देण्यात आले असून कंपनीची शहर व उपनगरांमध्ये मलवाहिन्या टाकण्याची कामेही फेटाळली जाणार आहेत.

पवई क्रेन दुघर्टना: मिशिगन कंपनीच्या कंत्राटांना बसणार चाप
SHARES

पवईतील मलवाहिन्याच्या कामात क्रेन कोसळून ४ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर या विकासकामाचा कंत्राटदार मिशिगन कंपनीच्या सर्वच कंत्राटांना आता चाप लागणार आहे. पवईतील मलवाहिन्याच्या कामाला स्थगितीचे आदेश देण्यात आले असून कंपनीची शहर व उपनगरांमध्ये मलवाहिन्या टाकण्याची कामेही फेटाळली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतल्यास पुढील कामांमधील निविदाही वादात अडकण्याची शक्यता आहे.


काळ्या यादीत टाकण्याची मागणी

मुंबई शहर व पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी तसेच पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरात विविध व्यासाच्या आर. सी. पाईप मलवाहिन्या मायक्रोटनेलिंग पद्धतीने टाकण्याच्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे. परंतु हे कंत्राट मिशिगन इंजिनिअरींग या कंपनीला मिळालं आहे. त्यामुळे ४ जणांचे बळी घेणाऱ्या आणि कंत्राट नियमांचं पालन न करणाऱ्या या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या कंपनीचे दोन्ही प्रस्ताव सध्या स्थायी समितीने अडवून ठेवले असून या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली आहे.


तर, एफआयआर दाखल करू

या दुर्घटनेप्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु तत्वत: मुंबई महापालिका प्रशासन आणि नियुक्त कंत्राटदार हेच या दुर्घटनेला जबाबदार असून या कंत्राटदारांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा न नोंदवल्यास भाजपाच्यावतीने आपण स्वत: महापालिका आयुक्त व संबंधि कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल करू, असा इशारा भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिला आहे. त्यामुळे मागील सभेमध्येच हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी लावून धरली होती. परंतु स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाचे एकदा म्हणणं ऐकून घेऊन पुढील बैठकीत निर्णय घेऊ, असं सांगत हा प्रस्ताव राखून ठेवला होता.


तोपर्यंत कामे नाही

त्यामुळे बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्याही परिस्थिती हा प्रस्ताव फेटाळून लावत मिशिगन या कंपनीला धक्क्याला लावायचं, असं समिती सदस्यांनी ठरवलं आहे. या कंपनीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळला गेल्यास आणि मलवाहिन्यांच्या कामांच्या निविदांमध्ये मिशिगन कंपनी पात्र ठरल्यास कंपनीला कामे द्यावी की नाही याचा प्रशासनाला विचार करावा लागणार आहे, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत या कंपनीबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना कुठलेही काम देता येणार नाही, असंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा-

पवईत क्रेन कोसळून ४ कामगारांचा मृत्यू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा