Advertisement

महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना सुरूवात

मुंबई महापालिकेनें मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी युद्धपातळीवर रस्ते दुरुस्ती, पूल बांधणी, नालेसफाई, मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई आणि पाणीपुरवठा प्रकल्पांची तब्बल ७३९ कामे हाती घेतली आहेत.

महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना सुरूवात
SHARES

पावसाळ्याला आता एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यामुळं मुंबईत पावसाळापूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. तसंच, मुंबईत कोरोनाचं संकट असलं तरी या कामांना चांगलीच गती मिळताना पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेनें मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी युद्धपातळीवर रस्ते दुरुस्ती, पूल बांधणी, नालेसफाई, मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई आणि पाणीपुरवठा प्रकल्पांची तब्बल ७३९ कामे हाती घेतली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३ हजार ३७९ कामगारांची फौज तैनात करण्यात आली आहे.

मुंबईत पावसाळापूर्व कामांना सुरूवात झाली असून, रस्त्यांची ५०, घनकचरा व्यवस्थापन विभागाची ६, पाणीपुरवठा विभागाची १५, तर मलनिस्सारण वाहिन्यांची ५ अशी एकूण ७६ कामं पूर्ण करण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. मागील पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या ४०५ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं पालिकेनं हाती घेतली आहेत. त्यापैकी ५० कामं पूर्ण झाली असून ३२२ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.

पावसाळ्यापूर्वी ६८ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. रस्ते कामे युद्धपातळीवर पूर्ण करता यावी यासाठी तब्बल एक हजार ५९१ कामगारांची फौज कार्यरत आहे. अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता, शंकरराव नारन पथ, घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता, वांद्रे पूर्व येथील हरि मंदिर रस्ता आदी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहे.

पालिका प्रशासनाने मुंबईमधील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. २९ पुलांची कामे सुरू असून तब्बल ६३० कामगार ही कामं करीत आहेत. त्यात शहरातील १२, पूर्व उपनगरातील ११ आणि पश्चिम उपनगरांतील ६ पुलांचा समावेश आहे. शहरातील १०, पूर्व उपनगरातील नऊ, तर पश्चिम उपनगरांतील २ अशा एकूण २५ पुलांची कामं प्रगतिपथावर आहेत. यात हँकॉक पूल, लोअर परळ पूल, नाहूर उड्डाणपूल यांचा समावेश आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं शहरात २०, पूर्व उपनगरात ३५, तर पश्चिम उपनगरांतील ३६ अशा एकूण ९१ ठिकाणी नाले, मोऱ्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. यापैकी ६ कामं पूर्ण झाली असून ३९ कामे प्रगतिपथावर आहेत. लहान-मोठ्या नाल्यांमधून गाळ उपसण्याचं काम पालिकेनं युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. जलवाहिन्या बदलणं, पाणीपुरवठा प्रकल्प ही कामंही पालिकेनं हाती घेतली आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा