Advertisement

कोरोनामुळं डाळींच्या किमतीत २५ टक्के वाढ

अनेक ग्राहक डाळीची खरेदी करत असल्यानं मागणीत तिप्पट वाढ झाली आहे.

कोरोनामुळं डाळींच्या किमतीत २५ टक्के वाढ
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं अनेक जण किराणमालाची साठवण करत आहेत. दुकानांबाहेर मोठी गर्दी करून नागरिक मालाची खरेदी करत आहेत. यामध्ये नागरिकांकडून डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक ग्राहक डाळीची खरेदी करत असल्यानं मागणीत तिप्पट वाढ झाली आहे. परंतु, लॉकडाऊनमुळं आवक होत नसल्यानं डाळींच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. 

८० रुपये किलोनं मिळाणारी तूरडाळ आता शंभरीवर पोहोचली आहेत. ही स्थिती आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या बाजारात डाळींची आवक राजस्थान, मध्य प्रदेश तसेच राज्यातील नागपूर, अकोला व यवतमाळ या शहरांतून होते. लॉकडाऊनदरम्यान धान्याच्या वाहतुकीवर बंधने नसली तरी टेम्पो, ट्रकचालकच गाडी नेण्यास तयार नाहीत. यामुळं डाळींची आवकच झालेली नाही. परिणामी आहे तो माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो आहे.

अनेक ग्राहक थेट घाऊक पद्धतीनं खरेदी करू लागले आहेत. अनेकांनी भरमसाठ खरेदी सुरू केली आहे. त्यामुळं सध्या डाळींची मागणी तिप्पटीनं वाढली आहे. मात्र राजस्थानहून येणारी मूगडाळ, अन्य शहरातून येणाऱ्या तूरडाळीची आवकही रखडली आहे. यातूनच भाववाढ होत असल्याची माहिती मिळते.

मुंबईच्या बाजारात दररोज ५५० ते ६०० गाड्या इतकी डाळींची मागणी असते. त्या तुलनेत आवकही तेवढीच असते. पण सध्या आवक १०० गाड्याही नाही. त्याचवेळी मागणी १ हजार १२०० गाड्या आहे. व्यापाऱ्यांकडं जुना साठा असल्याने तो माल सध्या पुरवणं सुरू आहे. आवक लवकर सुरळीत होण्याची गरज व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

डाळींचे भाव

प्रकार 
आधी 
आता
तूरडाळ 
८५-९० 
१००-१०५
मूगडाळ 
९०-१०० 
१२०-१३०
हरभरा डाळ 
७५-८० 
८५-९५
मसूर डाळ 
६५-७० 
८०-८५



हेही वाचा -

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा