
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) मुंबईसह (mumbai) देशभरातील तब्बल 15 ई-केटरिंग (E-catering) वेबसाइट्सवर बंदी घातली आहे.
या वेबसाइट्स त्यांचे अधिकृत भागीदार असल्याचे भासवून लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना जेवण पुरवत होत्या.
आयआरसीटीसीला बनावट ई-केटरिंग पोर्टल्सबद्दल शेकडो तक्रारी मिळत होत्या.
पश्चिम विभागातच सुमारे 300 ते 400 प्रवाशांनी जेवणाबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रवाशांनी जेवण न मिळणे, अन्नाचा निकृष्ट दर्जा, परताव्याचे वाद आणि ग्राहक सेवेचा अभाव यांसारख्या विविध समस्या नोंदवल्या आहेत.
आयआरसीटीसीने railrestro.com, railmitra.com, comesum.com, travelkhana.com, trainscafe.com आणि railmeal.com यांसारख्या 15 वेबसाइट्सविरुद्ध कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुरू केली आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये कायदेशीर नोटिस बजावण्यात आली त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये फौजदारी तक्रारीही (complaints) दाखल करण्यात आल्या.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक बनावट वेबसाइट्स पीएनआर क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ते आणि पेमेंट तपशील यांसारखी प्रवाशांची संवेदनशील माहिती गोळा करतात.
यामुळे प्रवाशांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग हल्ले आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या धोक्यांना सामोरे जावे लागते.
ट्रेनमध्ये जेवण पोहोचवण्याची सेवा अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याने, आयआरसीटीसीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या वेबसाइट्समुळे निष्पाप प्रवाशांची सहज फसवणूक होऊ शकते, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटते.
एप्रिल महिन्यापर्यंत, आयआरसीटीसीची ई-केटरिंग सेवा 400 हून अधिक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे आणि देशभरात दररोज सरासरी 1,55,000 हून अधिक जेवणाचे बुकिंग हाताळते.
यात 6,200 हून अधिक विक्रेते आणि फूड एग्रीगेटर्स सोबत काम करतात.
यामध्ये बेहरूझ बिर्याणी, मॅकडोनाल्ड्स, बिकानेरवाला, बिर्याणी ब्लूज, बिर्याणी बाय किलो, डॉमिनोज, फासोस, फिरंगी बेक, हल्दीराम, केएफसी, ला पिनोझ पिझ्झा, लंचबॉक्स, ओव्हन स्टोरी, पिझ्झा हट आणि स्वीट ट्रुथ यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.
आयआरसीटीसीने प्रवाशांना केवळ त्यांच्या अधिकृत ई-केटरिंग वेबसाइट, 'फूड ऑन ट्रॅक' मोबाइल ॲप, 1323 हेल्पलाइन किंवा अधिकृत भागीदार प्लॅटफॉर्मद्वारेच जेवण मागवण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा
