Advertisement

डिसेंबरमध्येही पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

सध्या हिवाळ्याला सुरूवात झाली असून, मुंबईकरांना थंडीची चाहूल लागत आहे. असं असलं तरी हवामान विभागानं डिसेंबर महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

डिसेंबरमध्येही पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
SHARES

सध्या हिवाळा सुरू असून, मुंबईकरांना थंडीची चाहूल लागत आहे. असं असलं तरी हवामान विभागानं डिसेंबर महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई पहाटे थंडी, सकाळी दमट वातावरण आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण असतं. शिवाय, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये १ डिसेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्यात मंगळवारपासूनच पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून दक्षिण व उत्तर कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बुधवारी मराठवाड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात व उत्तर महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद इथं बुधवारी १ डिसेंबरला आणि औरंगाबाद, जालना, बीड इथं तुरळक ठिकाणी २ डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं सरासरीच्या अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. कोकण आणि गोव्यात ४३ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३५ टक्के, मराठवाड्यात २२ टक्के पाऊस दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा अतिरिक्त आहे. विदर्भामध्ये १३ टक्के पाऊस सरासरी पावसापेक्षा कमी आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस या काळातील सरासरीपेक्षा कमी आहे. सिंधुदुर्ग आणि ठाण्यामध्ये सरासरीपेक्षा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस ठाण्यात १३८ टक्के अधिक आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा