Advertisement

बेस्टचे मीटर रीडर बनले बेस्ट समिती अध्यक्ष


बेस्टचे मीटर रीडर बनले बेस्ट समिती अध्यक्ष
SHARES

मुंबई - बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोकिळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोकिळ हे बेस्टचे कर्मचारी असून ते विद्युत विभागात मीटर रीडर पदावर कार्यरत होते. त्यामुळे बेस्टचा कर्मचारी बेस्ट समिती अध्यक्ष बनला असून तोट्यात जाणारा उपक्रम आणि कामगार, कर्मचाऱ्यांना वेळेवर न मिळणारा पगार आता वेळेवर मिळावा हीच अपेक्षा त्यांच्या सहकारी कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी शिवेसेनेकडून अनिल कोकिळ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपा तसेच काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध ठरली होती. गुरुवारी निवडणुकीची औपचारिकता झाली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोकिळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांना विजयी घोषित केले. कोकिळ हे लालबाग मधील प्रभाग 204 मधून निवडून आले आहेत. बेस्ट कामगार सेनेचे ते पदाधिकारी म्हणून सक्रिय होते. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बेस्टमधील सेवेचा राजीनामा दिला होता. प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कोकिळ यांना शिवसेनेने बेस्ट समिती अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. बॉक्स बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवड झाल्यावर भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट कामगारांचा पगार होईपर्यंत पुढील कोणतीही बैठक घेतली जाऊ नये, अशी सूचना केली. त्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष कोकिळ यांनी कामगारांचा पगार होईपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही असे सांगितले. पण लगेचच त्यांनी बेस्ट कामगार सेनेच्या वतीने झालेला सत्कार स्वीकारला. त्यामुळे कोकिळ यांची नौटंकी उघड झाली. दरम्यान, कामगारांचा पगार देण्यासाठी कॅनरा बँकेतून १०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जात असून येत्या 24 मार्च पर्यंत कामगारांचा पगार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा