Advertisement

मलवाहिन्यांच्या कंत्राटात महापालिकेची फसवणूक


मलवाहिन्यांच्या कंत्राटात महापालिकेची फसवणूक
SHARES

मुंबईतील मलवाहिन्या टाकण्याची कामे चरविरहित करण्यासाठी कंत्राटे दिली जात असली तरी प्रत्यक्षात खुल्या पद्धतीने चर खोदून कामे केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पवईतील मलवाहिनीच्या कामादरम्यान ज्या ५ कामगारांचा क्रेन पडून मृत्यू झाला, त्याठिकाणीही खुल्या पद्धतीने चर खोदूनच काम केलं जात होतं. तसेच भायखळ्यातही अशाचप्रकारे कामे केली जात असून चरविरहित मलवाहिन्यांची कामे दाखवून कंत्राटदार महापालिकेला लुटत असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. तसेच पवई दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार मिशिगन कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.


कशा रितीने फसवणूक?

मुंबईत मलनि:सारण वाहिन्याच्या कामांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीला आले होते. यापैकी एक कंत्राट मिशिगन कंपनीला मिळालं असून याच कंपनीचं काम पवईत सुरु असताना ५ कामगारांचा मृत्यू झाला. परंतु हे काम चरविरहित (स्ट्रेचलेस) केले असते तर अशाप्रकारची दुघर्टना झाली नसती. परंतु अत्याधुनिक पद्धतीने काम केलं जात असल्याचं सांगून महापालिकेकडून कंत्राट मिळवायचं आणि प्रत्यक्षात खुल्या पद्धतीने खोदकाम करायचं हाच प्रकार सध्या सुरु आहे. त्यामुळे एकप्रकारे मलनि:सारण खात्यात कंत्राटदारांकडून लूट सुरू असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला.


'कामांची तपासणी करा'

सपाचे रईस शेख यांनीही भायखळयात चरविरहित मलवाहिन्यांचं काम करण्याचं कंत्राट मिळवलं आणि प्रत्यक्षात खोदकाम होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे चरविरिहत कंत्राटकामांच्या नावावर महापालिकेचे पैसे लुटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत सुरू असलेल्या मलवाहिन्यांच्या कामांची तपासणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. महापालिकेचं कंत्राट मिळवल्यानंतर त्या सर्वांची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराची असल्याचं सांगत राजा यांनी मिशिगन ही कंपनी महापालिकेचा जावई असल्याचा आरोप केला आहे.


'एफआयआर दाखल करा'

पवईत मलवाहिन्याच्या कामांमध्ये ५ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी केवळ क्रेन चालकावर सदोष मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु महापालिकेने हे कंत्राट मिशिगन या कंपनीला दिलं असून कामादरम्यान कामगारांची सुरक्षा ठेवणं ही त्यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या ५ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेने कंत्राट दिलेल्या मिशिगन कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यावर याची जबाबदारी आहे, त्याच्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत कोटक यांनी केली. या मागणीला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला.

यापूर्वी मालाड येथे झालेल्या दुघर्टनेत क्रेन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. क्रेन मालकावर कारवाई करून कंत्राटदारांना मोकळं सोडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.



हेही वाचा-

पवईत क्रेन कोसळून 3 कामगारांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा