शिवडी - पालिकेच्या एफ - दक्षिण विभागाच्या वतीने शिवडीतल्या टी. जे. मार्गावरील प्रार्थना स्थळावर गुरुवारी तोडक कारवाई केली जाणार होती. मात्र या कारवाईला विरोध करण्यासाठी येथील परिसरातील शेकडो रहिवासी एकवटले होते. याची माहिती मिळताच रफी अहमद किडवाई पोलीस आणि शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या उद्धेशाने स्थानिकांशी संवाद साधला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. तर प्रार्थनास्थळाचे सबळ पुरावे पालिका अधिकाऱ्यांना दाखवण्यात आल्याने तूर्तास कारवाई टळली आहे, असे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आल्याने वातावरण शांत झाले.
शिवडी (प.) येथील टी. जे. मार्गावर सन 1931 साली मफतलाल इंडस्ट्रीजच्या मालकाने हे प्रार्थनास्थळ बांधले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत 76 वर्ष पुरातन प्रार्थना स्थळावर पालिकेने तोडक कारवाईची नोटीस बजावली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शिवडीकरांनी प्रार्थना स्थळाला घेराव घालून पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रार्थनास्थळाबाबतचे सबळ पुरावे सादर केले. त्यामुळे कारवाई तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे, असे स्थानिक नागरिक विजय म्हात्रे यांनी सांगितले.
पालिकेत सबळ पुरावे दाखवल्याने कारवाई थांबली आहे. परंतु कारवाई कायमची थांबवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितलं.