Advertisement

नगरसेवक निधीतील २५ कोटी गेले वाया, सत्ताधारी अपयशी


नगरसेवक निधीतील २५ कोटी गेले वाया, सत्ताधारी अपयशी
SHARES

मुंबई महापालिका नगरसेवकांना विभागातील विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी ६० लाखांचा निधी नगरसेवक निधीतून उपलब्ध करून दिला जातो. परंतु, नवनिर्वाचित नगरसेवकांचे पहिलेच वर्ष असल्याने तसेच संगणकीय प्रणालीतील वारंवारचा बिघाड यामुळे यंदा नगरसेवकांचा सर्व निधी खर्च झालेला नाही. २३२ नगरसेवकांसाठी तरतूद केलेल्या निधीपैकी केवळ ८२ टक्केच रक्कम खर्च झाली असून उर्वरीत १८ टक्के रक्कम वाया गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.


नगरसेवक निधीही..आणि विकासनिधीही!

मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित नगरसेवक अशा प्रकारे एकूण २३२ नगसेवक आहेत. या महापालिका सदस्यांना ६० लाखांचा नगरसेवक निधी आणि ४० लाखांचा विकास निधी याप्रमाणे १ कोटी रुपये विभागातील विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला जातो. या व्यतिरिक्त स्थायी समिती सदस्यांना ५० लाखपेक्षा अधिक निधी उपलब्ध होतो. त्याशिवाय महापालिका सभागृहाच्या कक्षेत महापौरांच्या माध्यमातूनही सर्व पक्षांना प्राप्त होणाऱ्या विकास निधीतून काही निधी नगरसेवकांसाठी उपलब्ध होतो.


११४ कोटींचा झाला खर्च

मात्र, नगरसेवकांना प्राप्त होणाऱ्या निधीपैकी ६० लाखांच्या नगरसेवक निधीचा हिशोब हा कागदोपत्री गाह्य धरला जातो. त्यामुळे सन २०१७-१८मध्ये २३२ नगसेवकांसाठी प्रत्येकी ६० लाख रुपयांनुसार एकूण १३९.२० कोटींची तरतूद केली होती. परंतु, यामधील सुमारे ११४ कोटी रुपये नगरसेवक निधीतून खर्च झाला आहे. मात्र, एरवी हा नगरसेवक निधी पूर्ण खर्च केला जातो. त्या तुलनेत यंदा हा कमी खर्च झालेला आहे.


निधी मुदत वाढवून देण्याची मागणी

महापालिकेत नव्याने नगरसेवक निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षी काही तांत्रिक कारणांमुळे निधी खर्च न झाल्याने हा निधी वाढवून देण्यास मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली होती. याला सर्व पक्षीय गटनेते आणि नगसेवकांनी पाठिंबा दिला होता. परंतु, संगणकीय सॅप प्रणालीतील बिघाड हा काही कालावधीसाठीच होता. त्यामुळे हा निधी वाढवून देण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.


२५ कोटींचा निधी गेला वाया

सन २०१२-१३मध्ये महापालिकेत नव्याने नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांना पहिल्या वर्षी जूनपर्यंत नगरसेवक निधी वापरण्यास परवानगी दिली होती. परंतु, त्यावेळी अन्य विकासनिधी वापरण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे, यापूर्वी दिलेल्या परवानगीच्या धर्तीवर नगरसेवक निधी वापरण्यास मुदतवाढ दिली असती, तर सर्वच नगरसेवकांना आपला हा निधी वापरता आला असता. परंतु, सत्ताधारी पक्ष कमजोर ठरल्याने त्यांनी हा मुद्दा लावून धरला नाही आणि त्यामुळे सर्व नगरसेवकांसाठी तरतूद केलेल्या निधीपैकी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी वाया गेला.

एप्रिल २०१८पर्यंत घेतलेल्या आकडेवारीनुसार नगरसेवक निधीचा वापर करण्यात पहिल्या ५ मध्ये भाजपाच्या ५ नगरसेविकांचा समावेश आहे. तर कमी नगरसेवक निधी वापरणाऱ्यांमध्ये एकेकाळी महापालिका कर्मचारी असलेल्या आणि नगरसेवक बनवण्याचा मान पटकावणाऱ्या सिंधुताई मसुरकर या आघाडीवर आहे. त्याखालोखाल सेनेच्या ऋतुजा तारी, भाजपाचे आमदार पुत्र आकाश पुरोहित, खासदार पुत्र निल सोमय्या आदींचा समावेश आहे.


निधी जास्त वापर करणारे (६० लाखांपैकी)

राजेंद्र नरवणकर - काँग्रेस - ६० लाख

प्रिती सातम - भाजपा - ५९ लाख रुपये
प्रियंका मोरे - भाजपा - ५८ लाख रुपये
श्रीकला पिल्ले - भाजपा - ५८ लाख रुपये
अनिता पांचाळ - भाजपा - ५८ लाख रुपये
निधी शिंदे - शिवसेना - ५७ लाख रुपये
तेजस्वी घोसाळकर - शिवसेना - ५६ लाख रुपये
हेतल गाला - भाजपा - ५६ लाख रुपये
आयेशा शेख - सपा - ५६ लाख रुपये
मुरजी पटेल - भाजपा - ५५ लाख रुपये


निधीचा कमी वापर करणारे

सिंधुताई मसुरकर - शिवसेना - २७ लाख रुपये
ऋतुजा तारी - शिवसेना - २९ लाख रुपये
आकाश पुरोहित - भाजपा - ३० लाख रुपये
आयेशा बानो - सपा - ३० लाख रुपये
अंजली खेडकर - भाजपा - ३५ लाख रुपये
निल सोमय्या - भाजपा - ३६ लाख रुपये
रिटा मकवाना - भाजपा - ३६ लाख रुपये
सुनिता मेहता - भाजपा - ३७ लाख रुपये



हेही वाचा

नगरसेवक निधीतून कचरापेट्या हद्दपार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा