Advertisement

बीकेसीतील कोविड रुग्णालय पूर्ण सुरक्षित, बीएमसीचा खुलासा

महापालिकेने म्हटलं आहे की, बीकेसी येथील 'जंबो फॅसिलिटी' ला निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहचल्याची माहिती खोटी आहे.

बीकेसीतील कोविड रुग्णालय पूर्ण सुरक्षित, बीएमसीचा खुलासा
SHARES

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील विशेष कोविड-१९ रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु या बातम्या निव्वळ अफवा असून कोविड रुग्णालयाची इमारत उत्तम स्थितीत (Rumours claiming that the Jumbo facility set up at BKC has been badly affected by cyclone nisarga is false says bmc) असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. 

धोका टळला

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबई, ठाण्यालाही बसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. ताशी ११० ते १२० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा काही प्रमाणात रायगडला दणका बसला. परंतु त्यानंतर हे वादळी मुंबई, ठाण्याकडे पाठ करून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याने मुंबईचा धोका टळला. या काळात सुरक्षेचा उपाय म्हणून बीकेसीत बांधण्यात आलेल्या विशेष कोविड १९ रुग्णालयातील काही रुग्णांना हलवून इमारत रिकामी करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. 

हेही वाचा - किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली

महापालिकेचा खुलासा

मात्र, दुसऱ्या दिवशी या रुग्णालयाचं चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्याबाबत महापालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खुलासा केला आहे. महापालिकेने म्हटलं आहे की, बीकेसी येथील 'जंबो फॅसिलिटी' ला निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहचल्याची माहिती खोटी आहे. येथील कुंपणाचं किरकोळ नुकसान झालं असून रुग्णालयाची इमारत उत्तम स्थितीत आहे. संध्याकाळपासून येथील कार्य सुरळीतपणे सुरू केलं जाईल. या रुग्णालयाचे काही फोटो देखील महापालिकेने शेअर केले आहेत. 

नितेश राणेंचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडिओ शेअर करत या कोविड रुग्णालयाचं नुकसान झाल्याचा दावा केला होता. एवढंच नाही, तर अशा तकलादू सुविधा उभारून सर्वसामान्यांचा पैसा वाया घातल्याचा आरोप देखील प्रशासनावर केला होता. 

आठवड्याभरात उभारणी

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने आठवड्याभराच्या कालावधीत या विशेष कोविड १९ रुग्णालयाची उभारणी केली आहे. हजार खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयाच्या शेजारीच आणखी एक रुग्णालय उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आयसीयू बेडचीही सुविधा उपलब्ध आहे. 

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा