• सलमानच्या घरासमोरचं शौचालय नियमबाह्य?
SHARE

वांद्रे पश्चिम येथील बँण्डस्टँण्ड येथे अभिनेता सलमान खान याच्या घरासमोरील शौचालय चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. असे असताना आता हे शौचालय नियमबाह्य असल्याचा आरोप सलमान खानचे वडील सलीम खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी केला आहे. या शौचालायमुळे त्रास होत असल्याचे म्हणत हे शौचालय हटवण्याच्या मागणीसाठी तसेच हे शौचालय कसे नियमबाह्य बांधण्यात येत आहे हे सांगण्यासाठी सोमवारी या दोघांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. जर शौचालय नियमबाह्य असेल तर त्याची योग्य ती चौकशी करत पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.

हगणदारीमुक्त स्वच्छ मुंबई योजनेचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर अभिनेता सलमान खान यालाच स्वत:च्या घरासमोर शौचालय नको असून, हे शौचालय हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे एकीकडे आश्चर्यही व्यक्त केले जात असून, सलमान खानवर टीकाही होत आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी नुकतेच महापौरांना एक पत्र पाठवत हे शौचालय हटवण्याची मागणी केली होती. या पत्रानुसार महापौरांनी एच पश्चिमच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवत यासंबंधीच्या कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शौचालय सुरू होण्याआधीच केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने विरोध करत शौचालय हटवण्याची मागणी केल्याचे कळवले होते. तर बॅण्डस्टॅण्ड हे पर्यटन स्थळ असून, तिथे लोकांची मोठी गर्दी असते. अशावेळी शौचालय आवश्यक आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. असे असताना सोमवारी वहिदा रेहमान आणि सलीम खान यांनी महापौरांची भेट घेत शौचालय हटवण्याची मागणी केलीच, पण शौचालय नियमबाह्य असल्याचा नवा मुद्दाही मांडला. शौचालय बांधण्यासाठी स्थानिकांना नोटिसा पाठवून त्यांच्या सूचना-हरकती घ्याव्या लागतात. मात्र अशी कोणतीही प्रक्रिया न करताच हे शौचलय बांधले जात असल्याचा आरोप यावेळी सलीम खान आणि वहिदा रेहमान यांनी केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या