Advertisement

Salons open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

येत्या २८ जूनपासून सलून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Salons open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या सलून चालकांना अखेर राज्य सरकारने दिलासा दिला आहे. येत्या २८ जूनपासून सलून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून सलून व्यावसायिकांना त्याचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली, तरी तिथं फक्त केस कापण्यासाठीच परवानगी असेल. दाढी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

त्याचसोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -  सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

मागील अडीच ते ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे नाभिक समाजाचा सलून/ ब्युटी पार्लर व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे खूप हाल होत आहे. हाताखाली काम करणाऱ्या कारागिरांना देण्यासही त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे कारागिरांच्या हातालाही काम उरलेलं नाही. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमांचं पालन करून महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागिरांनी आपापली, दुकाने-व्यवसाय बंद ठेवला. परंतु राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ लाॅकडाऊन शिथिल करताना नाभिक समाजाच्या व्यवसायाकडे पूर्णत: दुर्लक्ष केलं.

राज्यात जवळपास इतर सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. तिथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन होताना दिसत आहे. तरीही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याउलट सर्व खबरदारी घेऊन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक सलून मालक-चालकांना अजूनही दुकान उघडण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सलून, पार्लरची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने या व्यावसायिकांकडून होत होती. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा