पालिका क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरला सांताक्लॉज!

महापालिकेच्या ‘एन’ विभागात मुंबईच्या स्वच्छतेचा आणि साफसफाईचा संदेश हा सांता देत आहे. घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी हा सांताक्लॉज दिसत आहे.

  • पालिका क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरला सांताक्लॉज!
SHARE

‘सांताक्लॉज’ म्हणजे बच्चे कंपनीसाठी होणार गिफ्टचा पाऊसच. दरवर्षी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच जण ‘सांताक्लॉज’ची वाट पाहत असतात. कारण ‘सांताक्लॉज’ जिंगल बेल, जिंगल बेल; जिंगल ऑल दि वे’ या गाण्यासह मंजूळ घंटानाद करत, बच्चे कंपनीला ‘गिफ्ट्स’ देत असतो. मात्र, आता सांताक्लॉजने गिफ्टमधून चक्क स्वच्छतेचा संदेश दिला आहे. स्वच्छतेचा संदेश देणारा ‘सांताक्लॉज’ घाटकोपर परिसरात फिरत आहे. तसंच, जनतेशी संवाद साधत घाटकोपरमध्ये फिरत असल्याने हा सांताक्लॉज कुतूहलाचा विषय ठरला आहे.


स्वच्छतेचा संदेश

महापालिकेच्या ‘एन’ विभागात मुंबईच्या स्वच्छतेचा आणि साफसफाईचा संदेश हा सांता देत आहे. घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी हा सांताक्लॉज दिसत आहे. त्याचप्रमाणं, २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान महापालिकेच्या ‘एन’ विभागातील गर्दीच्या ठिकाणी हा सांताक्लॉज आपल्याला भेटणार आहेत.


ग्रिटींग कार्ड भेट

महापालिकेच्या ‘एन’ विभागातील शालेय विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयांशी संबंधित वेगवेगळे संदेश सांताक्लॉजमार्फत दिले जात आहेत. तसंच, सांताक्लॉज लहान मुलांना ‘गिफ्ट’ देखील देत आहे. त्याचबरोबर जे नागरिक रस्त्यावर किंवा पदपथावर कचरा फेकतील त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यासोबतच स्वच्छतेचा संदेश असलेले एक छोटेसे ‘ग्रिटींग कार्ड’ देखील सांताक्लॉज ‘गिफ्ट’ म्हणून देत आहेत. 


महापालिकेच्या ‘एन’ विभागाने सांताक्लॉजच्या सहकार्याने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेतली आहे. स्वच्छतेबाबत जाणीव जागृतीसाठी महापालिकेच्या इतर विभाग कार्यालयांनी देखील या प्रकारचा अभिनव उपक्रम आपापल्या क्षेत्रात राबवला पाहिजे.

 - अजोय मेहता, महापालिका आयुक्त


२५ डिसेंबर रोजीच्या ‘नाताळ’ सणाचे आणि पुढील आठवड्यात येणाऱ्या नवीन वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत सांताक्लॉजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्या मदतीने एन विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला मोठ्यांचा आणि लहानांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. 

- भाग्यश्री कापसे,सहाय्यक आयुक्त – ‘एन’ विभागहेही वाचा - 

तुर्भे स्थानकावर महिलेसमोर हस्तमैथुन

दुचाकी चोरणारे बंंटी-बबली अटकेत; ९ दुचाकी हस्तगत
संबंधित विषय
ताज्या बातम्या