सायन - सायन-धारावी स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने शाळेची मैदाने वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली जात आहे. महानगरपालिकेच्या गौरी मित्तल हायस्कूल, साधना हायस्कूल, डी. एस. हायस्कूल, अव्हर लेडी इंग्लिश स्कूल, वल्लभ संगीत विद्यालय अशा मिळून साधारण 8 शाळा आहेत. मात्र तिथल्या नगरसेविका राजश्री शिरोडकर या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मैदानातच नाना-नानी पार्क बांधण्याच्या प्रयात्नात आहेत. त्यामुळे या स्पोर्ट्स असोसिएशनने निषेध करण्यासाठी 27 सप्टेंबरपासून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. पुढील एक आठवड्यापर्यंत ही मोहीम राबवली जाणार असल्याचे असोसिएशनचे सचिव बाबाजी घोळे यांनी सांगितले. याबाबत पालिकेच्या एफ - उत्तर विभागाला लेखी निवेदन देण्यात आले असून, या मोहिमेची दखल न घेतल्यास 'तीव्र मैदान बचाव' आंदोलन छेडणार असा इशाराही घोळे यांनी दिला.