Advertisement

अखेर माहिमच्या कस्टम हाऊसमध्ये गार्डची नेमणूक


अखेर माहिमच्या कस्टम हाऊसमध्ये गार्डची नेमणूक
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून गर्दुल्ल्यांनी अड्डा बनवलेल्या माहीमच्या कस्टम हाऊसला अखेर सुरक्षा रक्षकाचा आधार मिळाला आहे. माहीममध्ये 2000 स्क्वेअर फूटच्या जागेत प्रशस्त असं कस्टम हाऊस होतं. मात्र हे कस्टम हाऊस अक्षरश: नशेचा अड्डा बनले होते. याचा नाहक त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागत होता. मात्र रात्रीचं फिरणंही इथे मुश्किल झालं होतं. या जागेवर वेश्या व्यवसाय देखील चालवला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यातच या कस्टम हाऊसच्या जागेची पहाणी केली असता सर्वत्र ड्रग्जची रिकामी पाकिटं, दारूच्या, बिअरच्या बाटल्या आणि काँडोमची विखुरलेली पाकिटे पहायला मिळत होती. मात्र आता सुरक्षा रक्षक ठेवल्याने नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला आहे.

1992-93 मध्ये जेव्हा येथे असलेल्या बांबू मार्केटला आग लागली तेव्हा हे कस्टम हाऊस देखील जळाले होते. त्यामुळे कस्टम विभाग दुसरीकडे हलवण्यात आला. त्याचवेळी कस्टम हाऊसची दुरुस्ती करून त्याला कुलूप देखील लावण्यात आले. मात्र त्यानंतर या विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे इथे अनैतिक प्रकार सुरू होते. याबाबत स्थानिकांनी मुंबई पोलीस तसेच कस्टम विभाग, सेंट्रल पब्लिक वर्क डिपोर्टमेंट यांच्याकडे अनेकदा तक्रारी देखील केल्या होत्या.

दरम्यान, सदर कस्टम हाऊसबाबत पुढच्या काळात काय योजना आहेत हे जाणून घेतले असता या विषयी कस्टम हाऊसचे जनरल मॅनेजर बेनी भट्टाचार्य यांनी लवकरच या प्रकरणात लक्ष घालून पीडब्ल्यूडीकडे प्रस्ताव पाठवून सदर ठिकाणी ऑफिशिअल गेस्ट हाऊस बांधण्यात येईल असे आश्वासन दिले होते. सध्या या विभागात कस्टम हाऊसमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कस्टम विभागाकडून तात्पुरती व्यवस्था करण्यात अाली आहे. येत्या काळात या ठिकाणी गेस्ट हाऊस बांधण्याची कस्टम विभागाची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र जेव्हापासून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे तेव्हापासून इथे गर्दुल्ल्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती स्थानिक इरफान मच्छीवाला यांनी दिली. तसेच कस्टम हाऊसच्या कम्पाऊंडची भिंत काही प्रमाणात उंच करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

सध्या या विभागात सुरक्षा रक्षक ठेवल्यापासून महिलांना फिरताना सुरक्षित वाटत असल्याचे मत स्थानिक फातिमा शेख यांनी व्यक्त केले. सध्या इथे एक गार्ड ठेवला आहे. लवकरात लवकर लक्ष घालून इथे नवीन गेस्ट हाऊस सुरू झाले तर सुरक्षित वाटेल असंही त्या यावेळी म्हणाल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा