कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका

  Mumbai
  कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका
  मुंबई  -  

  मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला सुरुवात झाली असून या मार्गावर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. याशिवाय कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी स्थायी समितीला दिली.


  ५३०३ कोटींचा पहिला टप्पा

  समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, तसेच पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण ३५.६ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी करण्यात येत आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे माचीवाल यांनी स्थायी समितीसमोर केलेल्या सादरीकरणात स्पष्ट केले आहे.


  ३४ टक्के इंधन वाचणार

  कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल, तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे.  हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के अर्थात ३५० टन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


  १ लाख लोकांना रोजगार

  सागरी मार्गाचे काम झाल्यावर सुमारे १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे. या मार्गावर सागरी भिंतींची उभारणी केली जाईल. त्यामुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल, असे त्यांनी सांगितले.


  कसा असेल कोस्टल रोडचा मार्ग


  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क बोगदे
  • अमरसन उद्यान जोडरस्ता
  • हाजीअली जोडरस्ता
  • वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (दक्षिण वरळी)
  • वांद्रे- वरळी सागरी सेतू जोडरस्ता (वरळी)
  • कार्टर रोड जोडरस्ता
  • रितूंभरा महाविद्यालय जोडरस्ता
  • मढ बेट जोडरस्ता
  • ओशिवरा जोडरस्ता
  • मालाड जोडरस्ता
  • कांदिवली जोडरस्ता
  हेही वाचा

  अ‍ॅम्बुलन्सचा सायरन आता 120 डेसिबलने वाजणार!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.