Advertisement

शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातील पाणी पळवतोय कोण?


शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातील पाणी पळवतोय कोण?
SHARES

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून याच पक्षाचे नगरसेवक आता पाण्याची समस्या सुटत नाही म्हणून बोंबाबोंब करत आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पाण्याची समस्या सोडवली जात नाही.

या प्रभागात आपण एकमेव शिवसेना नगरसेविका असून त्यामुळेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याविरोधात कुभांड रचलं जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांवर केला. त्यामुळे जर ही समस्या दूर झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आपण मोर्चा काढू, असा इशाराही शिवसेनेच्या नगरसेविकेनं दिला आहे.


'येथे' अपुरा पाणी पुरवठा

शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी हरकतीच्या मुदद्याद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत आपल्या ए विभागातील मच्छीमार वसाहतीत अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली.

मागील दोन महिन्यांपासून जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण वारंवार बैठका घेऊन या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु अधिकारी याला दादच देत नसून पाण्याचा दाब हा केवळ दोन पाऊंड आहे. यात काहीही वाढ होत नसून या विभागात शिवसेनेची आपण एकमेव नगसेविका असल्यामुळे आपल्याला हा त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


पाणीपुरवठा का होतो कमी?

आपल्याच भागातील पाणी पुरवठा हा एकेक तासांनी कमी केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. या भागात भाजपचे आमदार आणि बहुतांशी नगरसेवक देखील भाजपचेच आहेत. त्यामुळे सानप यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला.

या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देताना घाटकोपर रमाबाईनगर येथील शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांनी, आपल्या मतदार संघातील कामराज नगर येथेही अशाचप्रकारे पाणी समस्या असल्याचं सांगितलं.


आमदारांना भीती

या भागातील आमदारांना आपली भीती असल्यानं ते अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशाप्रकारचं कृत्य करत असल्याचा आरोप कदम यांनी केला. पाण्याचा दाब नसल्यामुळे झोपडपट्टी परिसरात जलवाहिनीची जोडणी देता येत नाही. परिणामी जुन्या गळक्या जलवाहिन्या गटारातून जात असल्यामुळे त्यातून दुषित पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.


पाणी पुरवठा एक तासांनी कमी

दहिसरमधील शिवसेना नगरसेवक संजय घाडी यांनीही आपल्या भागातील पाणी पुरवठा एक तासांनी कमी केल्याचा आरोप केला. तर शिवसेना नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी एम पूर्व विभागाला पूर्वी १२३ एमएलडी पाण्याचा पुरवठा व्हायचा. परंतु, आता तो पुरवठा ९८ एमएलडीवर आल्याचं सांगत यामुळे योग्यदाबानं पाणीच येत नसल्याचा आरोप केला.

या भागात प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन केलं जात आहे. परंतु, या लोकांचं पुनर्वसन करताना पाणी पुरवठा सुरळीत करण्याऐवजी उलटे पाणी पुरवठाच कमी केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.


'याबाबत जलअभियंतांना सूचना द्या'

मागील दोन महिन्यांपासून सुजाता सानप या प्रभाग समितीपासून ते इथपर्यंत आवाज उठवत आहेत. त्यामुळे याबाबत जलअभियंता यांना सूचना देऊन या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले जावेत, अशी सूचना सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी समिती अध्यक्षांना केली. यावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव, यांनी प्रशासनाला निर्देश देत यासर्व नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची पाहणी करून तेथील अडचणी दूर केल्या जाव्यात, असं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा