Advertisement

शिवसेनेचे नगरसेवक होणार बोलके!

हापालिकेच्या सत्तेचा कारभार एकट्याने चालवताना शिवसेनेने सर्वच नगरसेवकांना विविध खाते व विभागांचे विषय देऊन त्यांचे अभ्यास गट तयार केले आहेत. त्यामुळे या अभ्यास गटांच्या माध्यमातून त्या त्या गटांमधील नगरसेवकांना संबंधित विषयांवर बोलते केले जाणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवक होणार बोलके!
SHARES

मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात मागील २५ वर्षांपासून सुरु असली तरी यावेळी मात्र सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून आक्रमकपणा तसेच अभ्यासूपणा दिसून येत नाही. यावेळी भाजपासोबत असलेली युती तुटल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमधील ही उणीव दिसून येवू लागली आहे. त्यामुळेच आता महापालिकेच्या सत्तेचा कारभार एकट्याने चालवताना शिवसेनेने सर्वच नगरसेवकांना विविध खाते व विभागांचे विषय देऊन त्यांचे अभ्यास गट तयार केले आहेत. त्यामुळे या अभ्यास गटांच्या माध्यमातून त्या त्या गटांमधील नगरसेवकांना संबंधित विषयांवर बोलते केले जाणार आहे.


नगरसेवकांची तक्रार

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर अनेक शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात तसेच समित्यांच्या बैठकांमध्ये बोलण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार केली होती. मात्र, नगरसेवकांच्या तक्रारींची दखल आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आतापर्यंतच्या दहा महिन्यांच्या कालावधीत शिवसेनेच्या नगरसेवकांची चमक दिसून न आल्यामुळे आता यासर्व नगरसेवकांचे गट स्थापन करून त्यांना विविध विभाग व खात्यांच्या अभ्यास करायला लावले जाणार आहे.



अभ्यास गटांची संकल्पना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विषयांच्या अभ्यास गटांची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दहा ते बारा नगरसेवकांचा अभ्यासगट स्थापन केला आहे. शिवसेनेत चार माजी महापौर तसेच ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकांची संख्या असली तरी सर्वांचा वापर करून घेतला जात नाही. त्यामुळे सभागृहात सभागृहनेता आणि गटनेत्यांपलिकडे तसेच एक दोन नगरसेवक सोडले तर कोणाही नगरसेवकांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. परंतु आता या अभ्यास गटांच्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवकांची किमान एका विषयात तरी कमांड राहणार आहे.


विषय नेमून देणार

शिवसेनेच्या नगरसेवकांचा सर्वच विषयांचा अभ्यास आहे, किंबहुना ते प्रत्येक विषयाचा अभ्यास जाणून घेत आहे. परंतु या अभ्यास गटाच्या माध्यमातून किमान एका विषयात तरी मग तो पाणी, शिक्षण, आरोग्य, मलनि:सारण, रस्ते, करनिर्धारण, मालमत्ता आदी विभागांच्या विषयांमध्ये त्यांची मजबूत पकड असायला हवी. त्यामुळेच असे अभ्यास गट स्थापन केले असून हे सर्व नगरसेवक त्यांना नेमून दिलेल्या विषयांचा सखोल तसेच विस्तृत अभ्यास करणार आहे. एक अनुभवी नगरसेवकाच्या अधिपत्याखाली हा गट स्थापन केला आहे. त्यामुळे सभागृहात किंवा समित्यांमध्ये जो विषय चालू असेल त्यासंबंधित विषयाचा ज्या नगरसेवकांचा दांडगा अभ्यास असेल, त्यांना निश्चितच बोलण्याची संधी देऊन हे सभागृहातील चर्चा अभ्यासपूर्ण घडवण्यात येईल, असा विश्वास यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा