जैन यांच्या विरोधात नगरसेवक संतप्त

 Mumbai
जैन यांच्या विरोधात नगरसेवक संतप्त

अंधेरी पूर्वेकडील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत के-पूर्व विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्याकडून नगरसेवकांचा अवमान होत असल्याचा निषेध म्हणून महापालिका सभागृहच तहकूब करण्यात आले. हुकूमशाहीने वागणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान न करणाऱ्या जैन यांना त्वरीत हटवण्याची मागणी करत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. त्यामुळे यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अंधेरीतील के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन हे हुकुमशाहीने वागत असल्याचा हरकतीचा मुद्दा सुधार समिती अध्यक्ष तसेच शिवसेना नगरसेवक बाळा नर यांनी उपस्थित केला. अनधिकृत बांधकामावरून प्रभाग समितीची बैठक तहकूब केल्यामुळे याचा निषेध म्हणून जैन यांनी सर्व कर्मचारी व अधिकारी यांना काळे कपडे तसेच काळ्या रिबिन लावून कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. हे काळे कपडे एकप्रकारे नगरसेवकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी घातले होते. एकप्रकारे राजकीय पक्षांनी निदर्शने करावी, तशाप्रकारे हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांविरोधात केले होते. त्यामुळे जैन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सभाच तहकूब करावी

नर यांच्या या हरकतीच्या मुद्दयाला भाजपाचे सुनील यादव यांनी पाठिंबा देत जैन यांच्या कृत्याचा पाढा वाचला. याला सपाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी पाठिंबा देत अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही याचा निषेध करत ही सभाच तहकूब करण्यात यावी, अशी मागणी केली.


असले सडके आंबे काढून फेकून द्या

जैन यांचे हे कृत्य योग्य नसून यांच्यासारखे सडके आंबे काढून फेकायलाच हवे, असे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या दालनात नगरसेवकांना प्रवेश मिळणार नाही. परंतु स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तक्रारदार यांच्यासाठी मात्र यांची दालने खुली असतात, असा आरोप यशवंत जाधव यांनी केला.


जैन यांना त्वरीत निलंबित करा

नगरसेवकांना अश्लिल भाषेत बोलणाऱ्या देवेंद्र कुमार जैन यांच्या महापालिका अधिनियम 83 (ए)नुसार कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच ही कारवाई केली किंवा नाही याचा अहवाल महापालिका सभागृहापुढे सादर केला जावा, अशी मागणी यशवंत जाधव यांनी केली.


जैन यांचा अहवाल त्वरीत सादर करा

जैन यांच्याबाबत सभागृहाच्या भावना गंभीर असून त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच पुढील सभागृहात महापालिका त्यानियमातील अटीप्रमाणे कशाप्रकारे कारवाई केली आहे, याचाही अहवाल सादर केला जावा, अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.


नक्की घटना काय आहे

अंधेरी पूर्व येथील भाजपाचे नगरसेवक सुनील यादव यांच्या प्रभागातील केवळ एकच बांधकाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडले. त्यामुळे सुनील यादव यांनी एकाच व्यक्तीचे बांधकाम का तोडले असा सवाल करत त्यांना आजूबाजूची अनधिकृत बांधकामांवर कारवाई का केली नाही, असा जाब सहायक आयुक्तांना विचारला. 

परंतु ही कारवाई न केल्यामुळे के पूर्वच्या प्रभाग समिती अध्यक्षा उज्ज्वला मोडकसह ते जैन यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारून बसले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. दुसऱ्या दिवशी जैन यांनी केवळ दुकानांवर नाममात्र कारवाई केली. पण पूर्णपणे तोडली. याचा निषेध म्हणून बुधवारी के-पूर्वच्या प्रभाग समितीत हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचा निषेध नोंदवत समितीचे कामकाज तहकूब करण्यात आले.


भाजपावरच पलटवला शिवसेनेने गेम

मुळात उज्ज्वला मोडक व सुनील यादव हे भाजपाचे नगरसेवक आहे. आणि ज्यांच्याविरोधात ते आंदोलन करत होते ते जैन समाजाचे आहेत. याचा आधार गेम शिवसेनेचे बाळा नर यांनी सभागृहात जैन विरोधात वातावरण तयार केले. परंतु यादव वगळता कुणीही जैन यांच्या या मुद्यावर बोलले नाही. भाजपाचे सर्व सदस्य गप्प राहिले. त्यामुळे जैन समाजाचे कैवारी असलेले भाजपाचा गेम शिवसेनेने केल्याची चर्चा सभागृहात ऐकायला मिळत होती.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)Loading Comments