पालिकेची दिवसाला वॉर्डातल्या एकाच अनधिकृत बांधकामावर कारवाई!

  Mumbai
  पालिकेची दिवसाला वॉर्डातल्या एकाच अनधिकृत बांधकामावर कारवाई!
  मुंबई  -  

  झपाट्याने वाढत असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे मुंबईचा बकालपणाही वाढत चालला आहे. या अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी सातत्याने कारवाई करत असल्याचे महापालिकेचे म्हणणे अाहे. परंतु महापालिकेच्या कारवाई करण्याच्या गतीकडे पाहता अनधिकृत बांधकामांचा शहराला पडलेला विळखा साेडविण्यात प्रशासनाला कितपत यश येईल, हा प्रश्नच आहे. हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे सध्याच्या घडीला प्रत्येक वॉर्डात दररोज शेकडोच्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभी राहत असताना महापालिका दिवसाला केवळ एकाच अनधिकृत बांधकावर कारवाई करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.    

  खुद्द महापालिकेनेच हे वास्तव मान्य केले असून महापालिकेच्या 24 विभागांमध्ये दिवसाला केवळ 29 अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या आकडेवारीकडे पाहता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात महापालिकेचे अधिकारी पूर्णपणे निष्फळ ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.


  हेही वाचा

  मुंबईतील 482 अनधिकृत धार्मिक स्थळांवर होणार कारवाई


  395 दिवसांत 11 हजार 413 बांधकामांवर कारवाई -    

  मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासह विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आदेश दिल्यानंतरही मागील वर्षभरात सुमारे 11 हजार अनधिकृत बांधकामांवर 24 विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. एप्रिल 2016 ते एप्रिल 2017 या 13 महिन्यांच्या कालावधीत 11 हजार 413 बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या कालावधीत 13 महिन्यांचे साधारणपणे 395 दिवस होतात. ही बाब लक्षात घेतल्यास दररोज सरासरी 29 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली.

  अशी झाली कारवाई -

  या 13 महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने 3 हजार 619 निवासी, 2 हजार 506 व्यवसायिक, तर 5 हजार 288 झोपड्या तथा कच्च्या स्वरुपाच्या बांधकामांवर कारवाई केली आहे. मुंबईत अनधिकृत झोपडया वाढत् असतानाच एका वर्षात 5 हजारहून अधिक झोपड्यांवर कारवाई करण्यात महापालिका अधिकाऱ्यांना यश आलेले नाही.

  स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न -

  महापालिकेच्या 24 विभागांमध्ये सर्रासपणे अनधिकृत बांधकामे होत असताना, महापालिकेचे अधिकारीच त्यांना संरक्षण देत असतात. ही सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्याची महापालिकेची इच्छा नसून केवळ महापालिकेच्या दप्तरी आणि न्यायालयाला दाखवण्यापुरती कारवाईचे नाटक केले जाते. वर्षभरात केवळ 11 हजार अनधिकृत बांधकामांवरी कारवाईमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे हे अपयश उघड झाले असून खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचा कोणताही धाक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राहिलेला नसल्याचेही उघड होत आहे. मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून महापालिकेचे अधिकारी आपली पाठ थोपटवून घेत आहे. परंतु प्रत्यक्षात अनधिकृत बंधकामांवर नियंत्रण ठेवण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.