मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर

 Mumbai
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई - मुंबईच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा दणदणीत विजय झाला आहे. महापालिकेत पारदर्शतेचे पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाने सेनेचे उमेदवार महाडेश्वर यांना मत देत दोघांमधील युती जाहीर केली. काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना केवळ 31 मतंच मिळाली. मात्र, महाडेश्वर यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली असली तरी त्यांच्या विरोधात न्यायालयातील याचिकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे त्यांचे महापौरपद हे अडीच वर्षे टिकते की मध्येच महापौर पद सोडावे लागते याचीच चिंता शिवसेनेला सतावत राहणार आहे.

मुंबईच्या महापौर पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने प्रा. विश्वनाथ महाडेश्वर आणि काँग्रेसच्या वतीने विठ्ठल लोकरे निवडणूक रिंगणात होते. प्रारंभी पिठासीन अधिकारी तथा विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रथम अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पाडली. परंतु 15 मिनिटात कोणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात केली. या वेळी शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवक हे भगवे फेटे बांधून सभागृहात आले. या वेळी सेना आणि भाजपामध्ये जोरदार घोषणाबाजी रंगली होती. हात उंचावून आणि नाव पुकारून झालेल्या या मतदानात महाडेश्वर यांना 171 मते मिळाली. भाजपा समर्थक अपक्ष नगरसेविका मुमताज खान या तटस्थ राहिल्या. तर लोकरे यांना केवळ 31 मतेच मिळाली. मनसेचे सातही नगरसेवक गैरहजर राहिले तर 'सपा' आणि राष्ट्रवादी पक्ष तसेच 'एआयएमआयएम' चे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे पिठासीन अधिकारी यांनी महापौर म्हणून महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी सेना नगरसेवकांनी जोरात घोषणाबाजी केली.

प्रेक्षागॅलरीत शिवसेना- भाजपा नेत्यांची गळाभेट

महापालिका सभागृहातील प्रेक्षा गॅलरीत अनिल परब, अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर, अनंत तरे, राहुल शेवाळे, दिवाकर रावते, सदा सरवणकर, संजय पोतनीस, दत्ता दळवी, अरविंद सावंत, आदेश बांदेकर आदी लक्ष ठेवून होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर भाजपाचे योगेश सागर, भालचंद्र शिरसाट हेही प्रेक्षागॅलरीत गेले. तिथे या नेत्यांची अनिल देसाई आणि अनिल परब यांच्याबरोबर गळाभेट होताना पाहायला मिळाली.

भाजपाकडून मराठीचा वापर

महाडेश्वर यांचा उल्लेख शिवसेनेकडून प्रिन्सिपॉल असा, केला जात होता. परंतु भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीं प्रिंसिपॉल ऐवजी प्राचार्य असा उल्लेख करत मराठी भाषेचा वापर केला. त्यानंतर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी पुढे प्राचार्य असाच वापर केला.

उद्धव ठाकरेंसह सर्वांकडून शुभेच्छा

महापौरपदी महाडेश्वर यांची निवड झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त अजोय मेहता, भाजपा गटनेते मनोज कोटक, काँग्रेसचे गटनेते रवीराजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेत्या राखी जाधव, 'सपा'चे गटनेते रईस शेख आदींनी पुष्पगुच्छ देऊन महाडेश्वर यांना शुभेच्छा दिल्या.

सेनेची मस्ती
महापौर निवडीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेना जिंदाबाद, मुंबई आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची. एकच साहेब.. बाळासाहेब!, हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा!, छत्रपती शिवाजी महाराज की जय..अशा घोषणा देत भाजपालाच डिवचण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments