Advertisement

नालेसफाईच्या टक्केवारीवरून प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये दुमत


नालेसफाईच्या टक्केवारीवरून प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये दुमत
SHARES

मुंबईतील 95 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण दावा महापालिका प्रशासनाने केला असला, तरी सत्ताधारी शिवसेनेने मात्र नालेसफाईची 80 टक्केच कामे पूर्ण झाल्याचे म्हणत समाधान व्यक्त केले आहे. यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील दुमत स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुंबईतील नालेसफाईच्या कामांची डेडलाईन संपल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यासह विविध समित्यांचे अध्यक्ष व नगरसेवकांनी सफाईच्या कामांची पाहणी केली. प्रारंभी मुलूंड कचरा भराव भूमीची पाहणी केल्यानंतर पूर्व उपनगरातील सुमारे 10 ते 12 नाल्यांची पाहणी त्यांनी केली. या सर्व नाल्यांच्या सफाईची कामे समाधानकारक असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी एकूण नालेसफाईच्या 60 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्यातुलनेत झालेले 80 टक्के काम समाधानकारक असल्याचे महापौरांनी सांगितले असले, तरी प्रशासनाने यापूर्वीच 95 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांच्या दाव्यांमध्येच विसंगती आढळून येत आहे.

विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु मुंबईकरांना पावसाळ्यात कमीत कमी त्रास होईल याचाच प्रयत्न सत्ताधारी पक्ष म्हणून आपण करत असतो, असे महाडेश्वर यांनी सांगितले.

मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाही. यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते दिले जातील, असा दावा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केल्यानंतर सत्ताधारी पक्षानेही रस्त्याच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. 300 रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर 97 आणि गुरूवारी रात्री 90 रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, तेथे पर्जन्य जलवाहिनी टाकणे, मलनि:सारण वाहिनी टाकण्याची कामे सुरु आहेत. ती कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेतली जातील, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा