पादचारी पुलांना सरकते जिने बसवण्याची शिवसेनेची मागणी

  BMC
  पादचारी पुलांना सरकते जिने बसवण्याची शिवसेनेची मागणी
  मुंबई  -  

  पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे म्हणून मुंबईत अनेक रहदारीच्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहे. यासर्व पादचारी पुलांचा आढावा घेऊन जिथे शक्य असेल तिथे स्थानिकांची गरज लक्षात घेऊन पुलावर चढण्यासाठी स्वयंचलित जिने अर्थात सरकते जिने बनवण्यात यावेत,अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.

  सांताक्रूझ चेंबूर जोड रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात 'एमएमआरडीए' यांच्यामार्फत करण्यात आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ते महापालिकडे हस्तांतरीत करण्यात आले. या मार्गावर कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनी येथे पादचारी पूल बांधण्यात आले. परंतु या पुलाचा वापर लोकांकडून केला जात नसल्यामुळे याठिकाणी सरकते जिने अर्थात स्वयंचलित जिने बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी 2 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीला आला असता शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी वरळी नाका येथे रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत मार्ग तयार करण्याची मागणी असतानाही ते केले जात नाही. त्यामुळे याठिकाणी पादचारी पूल बांधले जावे,अशी मागणी केली. घाटकोपरमधील पंतनगरमधील लोकांना छेडा नगरला वळसा मारून जावे लागते. त्यामुळे वाहनांसाठी भूमिगत मार्ग पंतनगरला तयार करण्यात यावा,असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सर्व पादचारी पुलांवर चढण्यासाठी स्वयंचलित जिने बसवले जावे,अशी मागणी केली. शहरातील हँकॉक पुलाचा भाग तोडून ठेवला तरी अद्यापही कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याची नाराजी सपाचे रईस शेख यांनी व्यक्त केली.


  हेही वाचा

  महापालिका म्हणते, आता तुम्हीच लावा झाडे!

  पालिका शाळांचं रूप पालटणार


  मुंबईतील सर्वच स्थानकांना जोडून पादचारी पूल आणि स्कायवॉक आहेत,त्या सर्वांना सरकते जिने बसवण्यात यावे असे सांगत शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी यारी रोड सातबंगला अमरनाथ टॉवर ते सरदार वल्लभभाई पटेल नगरपर्यंत पूल उभारण्यात यावे,अशी मागणी केली. यावेळी शितलाप्रसाद कोरी यांनी हँकॉक पूलाबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असून, पुढील सुनावणी ही लवकरच असल्याचे सांगितले. या पुलाचे कंत्राट रद्द केल्यामुळे कंत्राटदाराने न्यायालयात दावा केला आहे. नाकारलेल्या कामाविरोधात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याचे कोरी यांनी सांगितल्यानंतर भाजपाचे मनोज कोटक यांनी याला आक्षेप घेत एक कंत्राटदार शहरातील जनतेला वेठीस धरत आहे. त्यामुळे कंत्राटदार कशाप्रकारे सक्षम आहे आणि महापालिका कशी हतबल आहे,याचे दर्शन घडते,असे सांगितले. त्यानंतर सदस्यांच्या मुद्दयांची नोंद घेऊन उत्तरे देण्याचे आदेश देत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सरकत्या जिन्यांचा प्रस्ताव मंजूर केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.