Advertisement

क्षयरोग रुग्णांना मांसाहार नाहीच! शिवसेनाही भाजपाच्या शाकाहारी वाटेवर!

शाकाहार आणि मांसाहाराचा मुद्दा जोरात पेटल्यानंतर शिवसेनेने, कुणी काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे सांगत शाकाहाराला विरोध केला होता. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मात्र याचा विसर पडला असून भाजपाच्या सोबत राहता राहता इस्कॉनसाठी त्यांनी मांसाहाराचा मुद्दा वर्ज्य केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

क्षयरोग रुग्णांना मांसाहार नाहीच! शिवसेनाही भाजपाच्या शाकाहारी वाटेवर!
SHARES

मुंबईतील क्षयरोग रुग्णांना सकस पोषक आहार म्हणून दिलं जाणारं दुपार आणि रात्रीचं जेवण हे पूर्णपणे शाकाहारीच राहणार आहे. शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात विविध जातीधर्माचे रुग्ण येत असल्यामुळे जे रुग मांसाहार करत आहेत, त्यांना अंडी आणि चिकन व मटण असे पदार्थ दिले जावेत, अशी मागणी काही सदस्यांनी केल्यानंतरही शिवसेनेने शाकाहारीचाच मुद्दा पुढे रेटत सरसकट सर्वच रुणांना शाकाहारी जेवणास मान्यता देऊन टाकली आहे. मांसाहारासाठी भांडणाऱ्या शिवसेनेकडून अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे खुद्द भाजपामधूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.


'शाकाहाराचा निर्णय कोणत्या आहार तज्ज्ञाचा?'

शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील तसेच बहादूरजी ब्लॉक येथील आंतररुग्णांना दुपार व रात्रीचे जेवण पुरवण्यासाठी पुन्हा एकदा इस्कॉन संस्थेची निवड करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याला जोरदार हरकत घेतली. 'केवळ शाकाहारच देण्याचा निर्णय कोणत्या आहारतज्ज्ञाने दिला?' असा सवाल त्यांनी केला.


इस्कॉनमुळेच मांसाहाराला विरोध?

इस्कॉन या संस्थेकडून रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या दोन्ही वेळच्या जेवणाचे पदार्थ हे एकच असून त्यात कोणताही बदल नाही. हे संपूर्ण जेवण पूर्णत: शाकाहारी आहे. महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये वाराच्या दिवशी किमान एक अंडे जेवणात दिले जाते. तेही या जेवणात नसून केवळ इस्कॉन संस्था असल्यामुळे मांसाहारी पदार्थ जेवणात दिले जात नाहीत का? असा सवाल जाधव यांनी केला.


मांसाहाराला नगरसेवकांचा पाठिंबा

अंडी आणि मटण व चिकन हेही तेवढेच पौष्टिक आहे. परंतु, रुग्णांना हे पदार्थ जेवणात न देता एकप्रकारे त्यांना सकस आहारापासून वंचित ठेवले जात आहे. रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जेवणात मांसाहारही तेवढाच आवश्यक असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले. याला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा दिला. सकस आहार पुरवताना तो शाकाहारीच दिला जावा, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे जो रुग्ण मांसाहार करत असेल त्याच्या जेवणात मांसाहारही उपलब्ध करून दिला जावा आणि जो रुग्ण शाकाहारी असेल त्यांना शाकाहार दिला जावा. रुग्णांना त्यांच्या आवडीप्रमाणे पर्याय दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.


पालिकेत शाकाहाराचा प्रस्ताव मंजूर

महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांना कमी किंमतीत आहार उपलब्ध करून देते आणि रुग्णांना अधिक दरात जेवण उपलब्ध करून देते, असे सांगत या रुग्णांना प्रोटिन्स पावडर उपलब्ध करून देण्याची सूचना शिवसेनेचे सदा परब यांनी केली. तर भाजपाचे विद्यार्थी सिंह यांनी जेवणात अंडी, मांस-मटण आणि ब्रोकरीसुद्धा द्या, अशी सूचना केली. त्यावर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्याचे आदेश प्रशासनाला देत हा प्रस्ताव मंजूर केला.


शिवसेना मांसाहार विसरली?

शाकाहार आणि मांसाहाराचा मुद्दा जोरात पेटल्यानंतर शिवसेनेने, कुणी काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे सांगत शाकाहाराला विरोध केला होता. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मात्र याचा विसर पडला असून भाजपाच्या सोबत राहता राहता इस्कॉनसाठी त्यांनी मांसाहाराचा मुद्दा वर्ज्य केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.



हेही वाचा

आयआयटी बॉम्बेच्या मांसाहार वादात 'पेटा'ची उडी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा