Advertisement

...तर झारीतल्या शुक्राचार्याचा डोळाच फोडणार - शिवसेना


...तर झारीतल्या शुक्राचार्याचा डोळाच फोडणार - शिवसेना
SHARES

निवडणुकांचे पडघम सुरु होताच शिवसेना मालमत्ता कराच्या सवलीतीबाबत आक्रमक झाली अाहे. शिवसेनेच्या मुंबईतील सर्व आमदारांनी सोमवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. शिवसेनेच्या आश्वासनांची पूर्तता होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे हे झारीतले शुक्राचार्य कोण असा सवाल करत या शुक्राचार्याचा डोळाच शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही, असाही गर्भित इशारा यावेळी देण्यात अाला.


घरांना करमाफी देण्याचा ठराव

शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनिल परब यांच्या नेतृवाखाली  शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या ५०० व ७०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव, आरोग्य सेविकांना मानधनात वाढ आणि गणेशोत्सव मंडळांच्या मंडपावरील कारवाई आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.


आयुक्तांनी पाठपुरावा करावा

३० मिनिटे सुरू असलेल्या या चर्चेनंतर आमदार सुनील प्रभू आणि अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की,  शिवसेनेने दिलेल्या आश्वासनानुसार मुंबईकरांना ५०० चौ. फुटाच्या घरांना करमाफी आणि  ७०० चौ. फुटाच्या घरांना कर सवलत देण्याचा ठराव मंजूर झाला. पण अद्याप महापालिका आयुक्तांना याबाबत कोणत्याही सूचना नसल्याने त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना या शिष्टमंडळाने केल्याचं त्यांनी सांगितलं.


झारीतले शुक्राचार्य कोण?

हा प्रस्ताव अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण? असा सवाल परब आणि प्रभू यांनी केला. एक वर्ष झालं तरी कोणतीही कार्यवाही नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली जाईल. नगरविकास खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आश्वानांची पूर्तता होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या झारीतल्या शुक्राचार्याचा डोळाच शिवसेना फोडणार आहे. ज्याचा डोळा फुटेल ती शुक्राचार्य असेल हेही समोर येईल, असा इशाराही यावेळी देण्यात अाला.  


जुन्या मंडळांना परवानगी नाकारली 

आरोग्य सेविकांना ५ हजार रुपयांऐवजी १० हजार मानधन देण्याची मागणी सेनेची असून याबाबत विधी विभागाचे अभिप्राय घेऊन याची कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं त्यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे १०० वर्षे जुन्या मंडळांना परवानगी नाकारली जात असून जे मूर्तिकार आहेत, त्यांच्याही मंडपाना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे याचा तीव्र निषेध करून  अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही यावेळी परब आणि प्रभू यांनी सांगितले.



हेही वाचा -

चालत्या ट्रेनमधून उतरणं अंगलट, ट्रेनसोबत गेला फरफटत

विद्यार्थ्यांचं प्राधान्य आयटीआयलाच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा