Advertisement

मैदाने लाटणाऱ्या शिवसेनेने 'स्वेट ऑन स्ट्रीट'च्या माध्यमातून मुलांना रस्त्यांवर खेळवले


मैदाने लाटणाऱ्या शिवसेनेने 'स्वेट ऑन स्ट्रीट'च्या माध्यमातून मुलांना रस्त्यांवर खेळवले
SHARES

मुंबईतील मैदाने आणि उद्यानांची संख्याकमी झाल्यामुळे चिमुरड्यांना खेळण्यासाठी मोकळ्या जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. मोकळ्या जागा राजकीय संस्थांनी लाटल्यामुळे मुलांना आता रस्त्यावर खेळण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या शिवसेना नेत्यांच्या संस्थांनी मोकळ्या जागा लाटल्या, त्याच शिवसेनेने मुलांना मनसोक्त खेळता यावे, म्हणून 'स्वेट ऑन स्ट्रीट' इव्हेंट राबवला. रहदारीमुक्त रस्त्याच्या गोंडस नावाखाली शिवसेनेने मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागा नाहीत, हे मान्य करत त्यांना रस्त्यांवरच खेळून आनंद घ्या, असाच जणूकाही संदेश दिला.


दिंडोशीचे युवासेना निरीक्षक अंकित प्रभू, शिवसेना शाखा क्रमांक ४०-४१ आणि 'स्वेट ऑन स्ट्रीट क्लब'च्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रविवारी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावली. दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलोमीटर रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरडे, लहान मुले आणि मोठ्यांनी विविध कला सादर करत सर्वांची दाद मिळवली. रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन हा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता रविवारी सकाळी ०७ ते १० या वेळेत रहदारीसाठी बंद केला होता. त्यामुळे येथील रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांसह लहान-मोठ्यांनीसुद्धा आपली कला सादर करून आदित्य ठाकरे यांची शाबासकी मिळवली.


मुलांना दिले 'याचे' धडे

या इव्हेंटमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ असे वेगवेगळे खेळ, व्यायाम आणि फिटनेसचे प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये दिलेल्या योगाची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे? आणि अडचणींवर कशी मात करायची? यावर उपाय अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या. मुळातच मुंबईतील कमी झालेली मैदाने, मोकळ्या जागेचा अाभाव यामुळे मुलांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन युवासेना, शिवसेना शाखा क्रमांक ४०-४१, भारतीय विद्यार्थी सेना आणि 'स्वेट ऑन स्ट्रीट' क्लब यांनी हा उपक्रम येथे राबवला. आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाची पोचपावती ही या कार्यक्रमाला जमलेली आहे, असे आमदार सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.


१०,००० दिंडोशीवासीयांचा सहभाग

रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर इत्यादी वसाहतीतील सुमारे १०,००० दिंडोशीवासीय यात सहभागी झाले होते. विधी समिती अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, नगरसेवक आत्माराम चाचे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, सदाशिव पाटील, प्रशांत कदम, विधानसभा संघटक अनघा साळकर आदी यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा

उद्याने, मैदानांचा विकास महापालिकेच्या पैशातून, देखभाल मात्र खासगी संस्थांकडे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा