Advertisement

लिपिकाच्या लग्नासाठी विभागाला टाळं, पालिका कार्यालयाचा कारभार!


लिपिकाच्या लग्नासाठी विभागाला टाळं, पालिका कार्यालयाचा कारभार!
SHARES

मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून कर्मचारी लग्नाला निघून गेल्याची बाब निदर्शनास आली आहे. खुद्द उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांना याचा अनुभव आला. तब्बल अर्धा तास निधी चौधरी या बंद कार्यालयाशेजारी उभ्या होत्या. परंतु, या कालावधीत कोणीही अधिकारी न आल्यामुळे अखेर त्या निघून गेल्या. त्यामुळे या विभागातील सर्व कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांना चौधरी यांनी मेमो दिला असून या सर्वांची या दिवसांची रजा लावण्याचे आदेश दिले आहेत.


नक्की घडलं काय?

'ईज ऑफ डुइंग बिजनेस'मुळे दुकाने व आस्थापना विभागावरील बराच भार कमी झाला आहे. त्यामुळे या विभागात आनंदी आनंद गडे असेच वातावरण आहे. त्यामुळे हाताला कोणतंही काम नसल्याने या विभागातील कर्मचारी मन मानेल तसे वागत आहेत. दादर हॉकर्स प्लाझा येथे दुकाने व आस्थापना विभागाचे मुख्य कार्यालय असून या विभागाला उपायुक्त विशेष निधी चौधरी यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. परंतु, या भेटी दरम्यान त्यांचे स्वागत होण्याऐवजी त्यांना कार्यालयालाच टाळे ठोकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बंद कार्यालयाबाहेर खातेप्रमुखांसह कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करत त्यांना थांबावे लागले. परंतु, या कालावधीतही कोणीही कर्मचारी न आल्याने त्यांना कोणताही आढावा न घेता परत कार्यालयात फिरावे लागले.


लिपिकाच्या लग्नाला गेले कर्मचारी!

हॉकर्स प्लाझा येथील दुकाने व आस्थापना विभागात मुख्य अधिकारी सुनिता जोशी यांच्यासह दोन उपअधिकारी, ७ ते ८ लिपिक आणि ७ ते ८ शिपाई असा कर्मचारी वर्ग आहे. या विभागातील एका लिपिकाचं लग्न असल्याने हे सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून लग्नाला निघून गेले होते. प्लास्टिकचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने जून महिन्यापासून ठोस कारवाई हाती घेण्यासाठी दुकाने व आस्थापने विभागाकडून आढावा घेण्यासाठी या कार्यालयाला चौधरी यांनी भेट दिल्याचे बोलले जाते.


उपायुक्तांनी दिला दुजोरा

या संदर्भात उपायुक्त विशेष निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. 'आपण दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीत तिथे भेट दिली होती. परंतु, त्यावेळी कार्यालयाला टाळे लावलेले दिसले. त्यामुळे आपण तिथून निघून येत खाते प्रमुखांसह सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना मेमो पाठवला आहे. तसेच त्यांची त्या दिवसाची बायोमेट्रिक हजेरी न नोंदवण्याच्या सूचना मानव संसाधन विभागाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर हे सर्व कर्मचारी आपल्याला भेटण्यास आले होते, त्यावेळी त्यांनी आम्ही सर्व लग्नाला गेल्याचे सांगितले', असे त्या म्हणाल्या.


खातेप्रमुखाला कारणे दाखवा नोटीस का नाही?

एखाद्या विभागाच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून ते बंद ठेवण्यासारखा गंभीर प्रकार घडूनही चौधरी यांनी केवळ मेमो दिला असला, तरी याबाबत त्यांनी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी होती. या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हे कार्यालय आडबाजूला असल्याने कोणी बघायला येणार नाही, असे ठरवत महापालिकेची अशी कार्यालये बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन कर्मचाऱ्यांमध्ये दरारा निर्माण करायला हवा, अशी मागणी होत आहे.



हेही वाचा

हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा