Advertisement

चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आता एक खिडकी योजना


चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आता एक खिडकी योजना
SHARES

चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट किंवा माहितीपट इत्यादींच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सिनेनिर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी या सर्व परवानग्यांसाठी अनेक ठिकाणी अर्जप्रक्रिया करावी लागत होती. मात्र, आता एकाच ठिकाणी या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगरपुरतीच राबविण्यात येणार असून त्यानंतर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.


१४ शासकीय विभागांचा समावेश

राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. त्यांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business) परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे निर्मात्यांना शासकीय स्थळावरील चित्रिकरणासाठी लागणाऱ्या परवानग्यांबाबतचा निर्णय पंधरा दिवसांच्या आत कळणार आहे. राज्य शासनाच्या १४ विभागांतर्गत येणाऱ्या स्थळांचा यात समावेश करण्यात आला आहे.


कशी असेल प्रक्रिया?

० निर्मात्यांनी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व अटी आणि शर्तींच्या पूर्ततेबरोबरच शुल्काचा भरणा केल्यास चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या स्थळांबाबतच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंत्राटदार संस्था संबंधित शासकीय यंत्रणेकडून परवानगी घेईल.
० संबंधित यंत्रणेने कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांत कोणताही प्रतिसाद दिला नाही तर चित्रिकरणास हरकत नाही असे ठरवून परवानगी देण्यात येईल.
कोणत्याही संस्थेला इतर कोणत्याही संस्थेच्या ना हरकत अथवा परवानगीची आवश्यकता भासणार नाही.
० चित्रीकरणासाठी एकदा परवानगी दिल्यानंतर त्या स्थळाबाबतचे आरक्षण रद्द करता येणार नाही किंवा त्याबाबतचे शुल्क परत केले जाणार नाही.
० परवानगी मिळण्यापूर्वी अर्ज रद्द केला तर प्रक्रिया शुल्क वगळून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
० यासाठी www.maharashtrafilmcell.com हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा