दहिसरचा स्कायवॉक झाला बंद


  • दहिसरचा स्कायवॉक झाला बंद
  • दहिसरचा स्कायवॉक झाला बंद
SHARE

दहिसर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकची दुर्दशा झाल्याने अखेर मुंबई महापालिकेने हा स्कायवॉक बंद केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा स्कायवॉक बंद केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
एमएमआरडीएने दहिसर पूर्वेकडील एस.व्ही. रोडवरील संमेलन हॉटेल ते पश्चिमेकडील रेल्वे स्थानक, दहिसर फाटक आणि विठ्ठल मंदिरापर्यंत जाणाऱ्या या स्कायवॉकची उभारणी तब्बल 8 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून केली होती. परंतु 8 वर्षांतच या स्कायवॉकची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने तो बंद करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

दोन महिन्यांपूर्वी या स्कायवॉकच्या दहिसर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील काही भाग कोसळला होता. इतर भाग कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. त्यामुळे या स्कायवॉकचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आर/उत्तर विभागाने हा स्कायवॉक बंद करण्याचा निर्णय घेतला.
दोन महिन्यांपूर्वी स्कायवॉकचा जो भाग तुटला होता, त्याच्या दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे सोडून पालिकेने हा स्कायवॉक थेट बंद करण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे या स्कायवॉकची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पुजारी यांनी केली आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या आर/उत्तर विभागातील सहायक आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या की, स्कायवॉकची झालेली दुरवस्था पाहता सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम एमएमआरडीए करणार आहे. त्यांना आम्ही या स्कायवॉकचा अहवाल पाठवला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या