राज्यात महिन्याभरात 'पॅरामेडिकल कौन्सिल'

  Mumbai
  राज्यात महिन्याभरात 'पॅरामेडिकल कौन्सिल'
  मुंबई  -  

  मेडिकल कौन्सिल, नर्सिंग कौन्सिल, फार्मसी कौन्सिल अशा कौन्सिलच्या धर्तीवर आता राज्यात पॅरामेडिकल कौन्सिलचीही स्थापना होणार आहे. या कौन्सिलची स्थापना करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात कौन्सिल प्रत्यक्षात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालया (डीएमईआर)चे संचालक डाॅ. प्रवीण शिनगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

  या कौन्सिलच्या माध्यमातून रूग्णालयासह पॅथालाॅजी लॅबमधील 21 प्रकारच्या सहाय्यकांची नोंदणी करुन घेत त्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तर त्याचवेळी पॅथालाॅजी लॅबची नोंदणीही याच कौन्सिलच्या माध्यमातून होणार असल्याने रूग्णालय तसेच पॅथालाॅजी लॅबमधील बोगस तंत्रज्ज्ञ आणि सहाय्यकांना आता आळा बसणार असून रूग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचेही डाॅ. शिनगारे यांनी सांगितले आहे.

  ऑपरेशन थिएटर, पॅथालाॅजी लॅब, एक्स रे टेक्निशीयन असे 21 प्रकारचे सहाय्यक रूग्णालय आणि पॅथालाॅजी लॅबमध्ये काम करतात. मात्र सध्या बोगस पॅथालाॅजी सहाय्यकांसह इतर सहाय्यकांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक पात्रता असलेल्या सहाय्यकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न मार्गी लावत या क्षेत्रात पारदर्शकता आणून रूग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारने 2012 मध्ये 'पॅरामेडिकल कौन्सिल अॅक्ट' आणला. 2013 मध्ये तो मंजूर करण्यात आला आणि 2014 मध्ये राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र त्यात बऱ्याच सुधारणा सुचवण्यात आल्याने तशा सुधारणा 2015 मध्ये करत 2016 मध्ये हे बिल अंतिमत: मंजूर करून घेण्यात आले. त्यानुसार आता प्रत्यक्षात कौन्सिलची स्थापना करण्याचे काम वेगात सुरू असून महिन्याभरात कौन्सिल प्रत्यक्षात येणार असल्याचे डाॅ. शिनगारे यांनी स्पष्ट केले आहे.

  अशा असतील तरतुदी -
  या कौन्सिलअंतर्गत रूग्णालयासह पॅथालाॅजी लॅबमधील 21 प्रकारच्या सहाय्यकांची नोंदणी करत त्यांना परवाना दिला जाईल. नोंदणी-परवाना असणाऱ्या व्यक्तीच सहाय्यक म्हणून काम करतील तर परवान्यामध्ये ज्या चाचण्या नमूद आहेत, त्या चाचण्या त्याच सहाय्यकाला करता येतील. त्या व्यतिरिक्त इतर चाचण्या केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

  तर पॅथालाॅजी लॅबची नोंदणीही या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत लॅब असेल, तरच चाचण्या करता येणार असल्याने बोगस लॅबला तसेच सहाय्यकांना आळा बसेल, चाचण्यांवरही कौन्सिलची नजर असेल. चाचण्यांच्या अहवालांची तपासणी कौन्सिलकडून करण्यात येईल. या तपासणीत काही गैर आढळल्यास दंडात्मक कारवाई कौन्सिलकडून करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सहाय्यकांची शैक्षणिक पात्रताही ठरवली जाणार असल्याने आवश्यक ती शैक्षणिक पात्रता असलेली व्यक्तीच नोंदणीसाठी पात्र ठरणार आहे.

  इथे असेल कौन्सिलचे मुख्यालय -
  कौन्सिलचे मुख्यालय मुंबईतच असणार असून जी. टी. रूग्णालय, सेंट जाॅर्ज रूग्णालय किंवा कामा रूग्णालय या तीन रूग्णालयांपैकी एका रूग्णालयात मुख्यालय सुरू करण्याचा विचार सूरू आहे. त्याचा अंतिम निर्णय लवकरच होईल, असेही डाॅ. शिनगारे यांनी स्पष्ट केले आहे.

  स्वागतार्ह निर्णय -
  पॅरामेडिकल कौन्सिलची स्थापना होणे हा निर्णय अत्यंत स्वागातार्ह आहे. या कौन्सिलमुळे सहाय्यकांची जबाबदारी वाढणार असून त्यांची शैक्षणिक पात्रता ठरणार असल्याने ही बाब रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट संघटनेचे सदस्य डाॅ. प्रसाद कुलकर्णी यांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.