शंभरची नोट मोजा आता पेंग्विन पहायला

  Mumbai
  शंभरची नोट मोजा आता पेंग्विन पहायला
  मुंबई  -  

  भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) मध्ये पेंग्विन पाहायला येणाऱ्यांना आता 100 रुपये मोजावे लागणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या बैठकीत पेंग्विन दर्शनासाठी आकारण्यात येणाऱ्या तसेच राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी शुल्क वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या शुल्कवाढीला मंजुरी देताना महापालिका शाळांमधील मुलांना गणवेशात असेल तर मोफत प्रवेश आणि आईवडिलांसह दोन मुले असल्यासही त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये आकारण्याऐवजी सरसकट शंभर रुपयेच शुल्क आकारून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

  राणीबागेतील प्रवेश शुल्क 2003 मध्ये वाढवण्यात आले होते. त्यानुसार सध्या प्रौढांना 5 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांना दोन रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. मात्र राणीबागेत दाखल झालेल्या सात पेंग्विन पक्षी यांचे दर्शन मागील काही दिवसांपासून खुले झाले असल्यामुळे राणीबागेचे शुल्क आणि पेंग्विन दर्शनचे शुल्क वाढीचा निर्णय महापलिका प्रशासनाने घेऊन नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने शुल्कवाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मांडला होता. यामध्ये मोठ्यांना 100 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता शंभर रुपयांचा दर कायम ठेऊन पालकांसह दोन मुले असल्यास त्यासर्वांना शंभर रुपये एवढेच शुल्क आकारण्याची सूचना केली आहे. तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना 25 रुपये आकारण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. त्यामुळे गटनेत्यांच्या मंजुरीनंतर आता स्थायी समिती आणि महापालिका सभागृहातील मंजुरीनंतर याची प्रत्यक्ष आकारणी केली जाणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.