दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे. लाॅकडाऊन लागू करूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहेत. ही शहरं पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार आहेत, अशी एक बातमी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असंही या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
या पोस्टबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ही बातमी पूर्णपणे खोडसाळ आहे. अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती पोस्ट केली असून ती व्हायरल करण्यात येत आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कल्याण-डोंबिवली आदी शहरात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु असताना मुंबई आणि पुणे येथे रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी शनिवारपासून १० दिवस संपूर्णपणे मुंबई आणि पुणे शहरे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट खोडसाळ आणि चुकीची तसेच अफवा पसरविणारी आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा -
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी
राज्यात १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस