'विद्यापिठाच्या जागेवरील झोपड्यांचे सर्वेक्षण करा'

  Mumbai University
  'विद्यापिठाच्या जागेवरील झोपड्यांचे सर्वेक्षण करा'
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापिठाकडे प्रचंड सुरक्षा व्यवस्था असताना, विद्यापिठाच्या जागेवर अतिक्रमण झालेच कसे? असा सवाल करत उच्च आणि तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. या अतिक्रमित झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने या झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम त्वरीत सुरू करावे, असे आदेश नुकतेच गृहनिर्माण विभागाला दिले आहेत. वायकरांच्या या निर्णायामुळे कलिना विदयापीठ परिसरातील वाल्मिकी नगरमधील झोपडपट्टीवासियांना दिलासा मिळणार आहे.

  वाल्मिकी नगरमधील झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नासंबंधीची एक विशेष बैठक वायकर यांच्या दालनात पार पडली. विद्यापिठाच्या जागेवर 1998 पासून अतिक्रमणास सुरूवात झाली. 2007 मध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. परंतु पुन्हा रातोरात येथे झोपड्या उभ्या राहिल्याची माहिती यावेळी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी दिली. दरम्यान ही जागा विद्यापिठाची असल्याने या जागेवर झोपू योजना राबवता येणार नसल्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून यावेळी देण्यात आली. त्यामुळे या झोपडपट्टीवासियांना निष्कासित करत पात्र झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे म्हणत सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापिठाच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम करण्याचेही आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणानुसार पात्र रहिवाशांचे कुठे आणि कसे पुनर्वसन करायचे यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी वायकर यांनी झोपडपट्टीवासियांना दिले.

  अतिक्रमणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई

  विद्यापिठाकडे सुरक्षा व्यवस्था असतानाही अतिक्रमण झाले कसे? संरक्षक भिंत का बांधली नाही? असे प्रश्न यावेळी करत अतिक्रमणास जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.