Advertisement

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन!

कोरोनाच्या उद्रेकाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर कमालिचा ताण आल्यामुळे अखेर या जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन!
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) उद्रेकाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर कमालिचा ताण आल्यामुळे अखेर या जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ मे पासून कोल्हापूरमध्ये १० दिवसांचा, तर सांगलीत ८ दिवसांचा कडक लाॅकडाऊन असणार आहे. 

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून संचारबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्हाबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले. कडक निर्बंध लादूनही लोकांची वर्दळ न थांबल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावतच राहीला. परिणामी राज्यात दररोज ५० ते ६० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. काही जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असली, तरी काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. 

यामुळेच कोल्हापूरमध्ये १० दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं की, कोल्हापूर जिल्ह्यात मागील २ दिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली नसली, तरी पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ अजूनही सुरूच असल्याने कोरोना संक्रमणाला आळा घालण्यात अडचणी येत आहेत. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्यासाठी सांगली, सिंधुदूर्ग, निपाणी, बेळगाव भागातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो, हे ओळखून बुधवार ५ मे सकाळी ११ पासून १५ मे पर्यंत कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.  

हेही वाचा- कोरोनाचा 'आयपीएल'ला फटका; संपूर्ण स्पर्धाच रद्द

याच प्रकारे सांगलीतील परिस्थितीही चिंताजनक बनत चालल्याने तिथंही आठवड्याभराचा लाॅकडाऊन लावत असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली. ते म्हणाले, सोमवारी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत.

आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावं लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल. 

जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचं जीवन महत्त्वाचं आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

(strict lockdown in kolhapur and sangli district of maharashtra due to covid 19 pandemic)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा