गेट वे जवळील सार्वजनिक शौचालयातून ‘सुलभ’ची हकालपट्टी

Gateway of India
गेट वे जवळील सार्वजनिक शौचालयातून ‘सुलभ’ची हकालपट्टी
गेट वे जवळील सार्वजनिक शौचालयातून ‘सुलभ’ची हकालपट्टी
See all
मुंबई  -  

गेट वे ऑफ इंडियाजवळील सार्वजनिक शौचालयामध्ये दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरलेली असतानाच याठिकाणी महिलांकडून लघुशंकेसाठीही पाच रुपये आकारले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे या शौचालयाची देखभाल करणाऱ्या सुलभ संस्थेचा करार रद्द करून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा प्रकारे शौचालय देखभाल संस्थेचं कंत्राट रद्द करण्याची ही मुंबईतली पहिलीच घटना आहे. काही महिन्यापूर्वीच या संस्थेला शौचालयातील अस्वच्छता आणि महिलांकडून लघुशंकेसाठी आकारले जाणारे शुल्क यामुळे महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतर सुलभ संस्थेच्या कामगिरीत बदल न झाल्यामुळे अखेर गुरुवारी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ राखण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने देखभाल करणाऱ्या संस्थांना दिले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय स्वच्छ राखण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने सुरू असतानाच गेट वे ऑफ इंडियाजवळील सार्वजनिक शौचालयाच्या चालकाकडून पर्यटकांकडून लूट सुरू होती. येथे येणाऱ्या महिला पर्यटकांकडून लघुशंकेसाठीही पाच रुपये आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याचे स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये संस्था चालकाकडून महिलांकडून पाच रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याचे आढळून आले. 

राईट टू पीअंतर्गत लघुशंकेसाठी पैसे आकारू नये असा नियम आहे. याबरोबरच शौचालयाच्या स्वच्छतेचा दर्जा ठरवण्यासाठी बसवण्यात आलेल्या मशिनमध्येही 83 टक्के लोकांनी हे शौचालय अस्वच्छ असल्याचे तसेच तिथे दुर्गंधी असल्याचा कौल दिल्यामुळे या संस्थेचा करार संपुष्टात आणून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाचे तसेच ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. या संस्थेला यापूर्वी नोटीस देत समजही देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.