Advertisement

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचं सर्वेक्षण होणार, इतर पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी

सर्व आरे स्टॉल्सचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे.

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचं सर्वेक्षण होणार, इतर पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी
SHARES

मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचं वितरण करण्यात आलं होतं. मात्र काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरण्यात येत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व आरे (aarey milk) स्टॉल्सचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. आरे स्टॉल्सचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी केदार यांनी हे निर्देश दिले.  

बैठकीत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी मुंबईत आरे स्टॉल्सवरून सद्यस्थितीत आरे उत्पादनाची होणारी स्टॉलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टॉलची संख्या,सध्या प्रत्यक्ष चालवित असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉल्सची संख्या अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा- अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचं दर्शन

दरम्यान, मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार (sunil kedar), मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं.

मंत्रालयातील हा स्टॉल स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक तयार करण्यात आलेला आहे. महानंद आणि आरे यांनी उत्पादन केलेली आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाची दुग्ध उत्पादने या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची सुरुवात राज्याच्या राजधानीपासून करण्यात आली असून राज्यातही दोन्ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष वामनराव देशमुख, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील यांच्यासह महानंदचे आणि आरेचे सर्व व्यवस्थापक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

(sunil kedar order to survey all aarey milk stall)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा