मुंबईत स्वाईन फ्लूचे 13 रुग्ण

 Mumbai
मुंबईत स्वाईन फ्लूचे 13 रुग्ण
Mumbai  -  

मुंबईत एप्रिल महिन्यात स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण आढळून आले असून मंगळवारी स्वाईन फ्लूच्या एकूण रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे. मुंबईत 2015 या वर्षी स्वाईन फ्लूच्या 3 हजार 29 रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या व्यवस्थापनामुळे मुंबईत 30 हून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर उपाययोजना केल्याने 2016 मध्ये स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी आढळून आला. पण यावर्षी सुरूवातीपासूनच स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्वइन फ्लूची लागण झालेले नऊ रुग्ण आढळून आले होते. हे सर्व रुग्ण दादर, परळ, लालबाग आणि भायखळा या परिसरातील होते. एप्रिलमध्ये 4 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावरून चार महिन्यात मुंबईत 13 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.

एप्रिल महिन्यात 4 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्वाईन फ्लूची भीती न बाळगता स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. ताप आणि सर्दी झाल्यास घरगुती उपाय न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसंच गर्दीच्या ठिकाणी स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांनी फिरू नये आणि तोंडाला मास्क वापरावा, असा सल्ला पालिकेच्या साथीरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी दिला आहे.

Loading Comments