तारापोरवाला मत्स्यालय झाले बेरंग

 Girgaon
तारापोरवाला मत्स्यालय झाले बेरंग
Girgaon, Mumbai  -  

शहरातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध तारापोरवाला मत्स्यालय म्हणजे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र. मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच तारापोरवाला मत्स्यालयाची भव्य इमारत दिसते. ही इमारत बाहेरुन अत्यंत छान दिसत असली तरी आतून परिस्थिती मात्र वेगळी आहे. नूतनीकरणाच्या दीड-दोन वर्षांतच या इमारतीची दुरवस्था झालेली आहे.

तारापोरवाला मत्स्यालयात जलचरांना ज्या टँकमध्ये ठेवण्यात आले आहे, त्या टँकमधील भिंती इतक्या खराब झाल्या आहेत की, भिंतीवरील रंगाच्या खपल्या टँकमध्ये पडत आहेत. यामुळे टॅंकमधील पाणी प्रदूषित होऊन जलचरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून तारापोरवाला मत्स्यालयाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र मत्स्यालय सुरू करून दोन वर्षेही पूर्ण झालेली नसताना मत्स्यालयातील भिंती खराब झाल्या आहेत. मत्स्यालयाच्या डागडुजीकडे मत्स्यालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या विरोधात अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे (पॉज) सचिव सुनीश कुंजू यांनी बुधवारी मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त आणि पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या मत्स्यालयात खाऱ्या आणि गाेड्या पाण्यातील 200 हून अधिक जातींचे मासे आहेत. यात परदेशातून आयात केलेल्या 100 हून अधिक जातींचाही समावेश आहे. मत्स्यालयाच्या नूतनीकरणानंतर पाण्याखालील माशांचे जग पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली. परंतु मत्स्यालय प्रशासनाच्या अनागोंदीमुळे पर्यटकांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे.

मत्स्यालय प्रशासनाने एका जलचराचे नाव असलेल्या टँकमध्ये दुसऱ्या जातीच्या जलचराला ठेवल्याने पर्यटकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर मत्स्यालयासंदर्भात माहिती देताना मुलांना माशांना हात लावून जलचरांच्या दुनियेचा अनुभव घेता येईल, अशा पुलाची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मुलांना असा कोणताही अनुभव घेता येत नाही. भिंती रंगविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑईल पेंटचा वापर करण्यापेक्षा टँकची सजावट नैसर्गिक पद्धतीने वनस्पती, दगड ठेवून केली असती, तर जलचरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरले असते. सद्यस्थितीत तरी रंग निघालेल्या भिंतींची तात्काळ डागडुजी करणे गरजेचे आहे.
- सुनीश कुंजू, सचिव, अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी

Loading Comments